पैसे पडल्याचे सांगत मोबाईलसह 15 हजारांची रोकड लांबवली : भुसावळातील घटना

भुसावळ : वाहनाबाहेर पैसे पडले असल्याचे सांगत दोघा भामट्यांनी वाहनातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 15 हजार रुपये किंमतीची रोकड लांबवल्याची घटना शहरातील जामनेर रोडवर रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघा अज्ञात भामट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला वाहनातून उतरताच लांबवली रोकड
बोदवड येथील विजय शिवराम बडगुजर (61, बोदवड) हे दवाखान्याच्या कामानिमित्त पत्नी व चालकासह इनोव्हा (एम.एच.20 ए.वाय.2346) ने भुसावळातील जामनेर रोडवरील एका दवाखान्यात सोमवारी सकाळी 10 वाजता आले होते. दवाखाना सुरू होण्यास दिड तासांचा अवधी असल्याने पत्नीसाठी फळे आणण्यासाठी विजय बडगुजर चालकासह बाहेर पडले तर पत्नी पुष्पा बडगुजर या इनोव्हा वाहनात बसून होत्या. याचवेळी दोन अज्ञात भामट्यांनी वाहनाबाहेर पैसे पडले असल्याचे पुष्पा बडगुजर यांना सांगितल्याने त्या वाहनाखाली उतरताच दुसर्‍या भामट्याने इनोव्हातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 15 हजारांची रोकड लांबवली. काही कळण्याच्या आत भामटे पसार झाले. विजय बडगुजर यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत घडला प्रकार सांगितल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.