पैसे परत करण्याची योजना लेखी द्या!

0

उच्च न्यायालयाचे डीएसकेंना आदेश; अटकपूर्व जामिनास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले डीएसके बिल्डर्स डेव्हलपर्स लि.चे सर्वेसर्वा दीपक सखाराम कुलकर्णी व संचालिका हेमंती कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. यावेळी मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करू, असे डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. त्यावर तुम्ही ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार आहात, हे आम्हाला लेखी सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, या अटकपूर्व जामीनअर्जावर पुढील सुनावणी 30 नोव्हेंबररोजी ठेवत तोपर्यंत कुलकर्णी दाम्पत्याला अटकेपासून संरक्षण देण्यात आले.

तुमच्याकडे मालमत्ता किती, बाजारभावासह यादी दाखवा!
डीएसकेंच्यावतीने प्रसिद्ध विधिज्ज्ञ अशोक मुंदरगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच, ठेवीदारांच्या ठेवी परत करावयाच्या असून, त्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे, अशी मागणी केली. मालमत्ता विकून या ठेवी परत केल्या जातील, असेही ते म्हणाले. त्यावर ठेवीदारांना त्यांचा पैसे परत हवे आहेत. ते तुम्ही कसे देणार आहात, त्याचे नियोजन आम्हाला लेखी सादर करा. तुमच्याकडे किती मालमत्ता आहे, त्यांची बाजारभावानुसार किती किंमत आहे, याबाबत सविस्तर म्हणणे लेखी स्वरुपात सादर करा, असे न्यायमूर्ती अजेय गडकरी यांनी डीएसकेंच्या वकिलांना आदेशित केले. बहुतांश ज्येष्ठ नागरिक असलेले सुमारे 1350 ठेवीदारांनी डीएसकेंविरोधात ठेवी परत मिळत नसल्याने पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीची तक्रार दाखल केलेली आहे. या ठेवीदारांना त्यांचे पैसे तातडीने परत हवे आहेत, या बाबीकडेही न्यायमूर्तींनी डीएसकेंच्या वकिलांचे लक्ष वेधले. सद्या 13 गृह प्रकल्पांचे 48 लाख चौरस फुटांचे बांधकाम सुरु असून, आगामी तीन महिन्यांत ते पूर्ण होऊन दोन हजार कोटी रुपये त्यातून उभे राहतील, असेही अ‍ॅड. मुंदरगी यांनी न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.

पोलिसांकडून डीएसकेंची आर्थिक कोंडी
न्यायमूर्ती गडकरी यांनी कुलकर्णी दाम्पत्याच्या अर्जावर आता पुढील सुनावणी 30 नोव्हेंबररोजी ठेवली असून, तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. डीएसकेंच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी यापूर्वीच त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकलेले असून, दस्तावेज हस्तगत केलेले आहेत. तसेच, या मालमत्ता गोठविण्याबाबत महसूल प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सुमारे 189 कोटी रुपयांच्या ठेवी डीएसकेंना परत करावयाच्या आहेत. पोलिसांच्या पत्रानुसार, डीएसके उद्योग समूहांचे बँक खाते बँकांनी गोठवलेले असून, त्यामुळे डीएसकेंची मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे. परवाच डीएसकेंनी पुण्यात सहपरिवार पत्रकार परिषद घेऊन पैसे बुडवून पळून जायाला मी काही विजय मल्ल्या नाही, असे ठासून सांगितले होते.