मुंबई – पैसे भरण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून एका 64 वर्षांच्या वयोवृद्धाला भामट्याने फसविल्याची घटना जुहू परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी पळून गेलेल्या भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गिरीष रामजी कोळी हे वयोवृद्ध रिक्षाचालक असून ते सध्या मिरारोड येथील न्यू म्हाडा इमारत क्रमांक दहा, शांती गार्डनच्या एन/602 मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात.
काल सकाळी साडेअकरा वाजता ते विलेपार्ले येथील मिठीबाई जंक्शनजवळील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये 49 हजार रुपये जमा करण्यासाठी आले होते. मात्र वयोवृद्ध असल्याने त्यांना ती रक्कम भरता येत नव्हती. यावेळी तिथे एक तरुण आला, त्याने आपण पैसे भरण्यास मदत करतो असे सांगून त्यांच्याकडून ती रक्कम घेतली. त्यानंतर त्यातील 35 हजार रुपये त्याने दुसर्या खात्यात जमा करुन उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यात टाकली होती. काही वेळाने त्याने ही रक्कम काढून तेथून पलायन केले होते. हा प्रकार नंतर गिरीश कोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या जबानीनंतर जुहू पोलिसांनी पळून गेलेल्या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. एटीएममधील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या भामट्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.