नवी दिल्ली । गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणार्या सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाहीच. पैसे भरण्यासाठी तुम्हाला याआधीच पुरेसा वेळ देण्यात आला आहे. आता तुम्ही दिलेल्या मुदतीत पैसे भरले नाहीत तर अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करु असे सर्वोच्च न्यायलयाने सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सुनावले आहे.
सर्वोच्च न्यायलयाने 13 एप्रिलपर्यत सेबीकडे 5,092 कोटी रुपये भरण्याचा आदेश सहारा समुहाला दिला होता. त्यावर न्यायलयाने आणखी वेळ द्यावा अशी विनंती सहारा समुहाने सर्वोच्च न्यायलयाला केली होती. गुरुवारी या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान सहारा समूहाची मागणी े फेटाळून लावताना, पैसे भरण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत बदल करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
मागील महिन्यात झालेल्या सुनावणीच्यावेळीस लिलावासाठी 15 मालमत्तांची यादी सहारासमूहाने न्यायालयला दिली होती. या यादीतील 13 मालमत्ता विकून पाच हजार कोटी मिळतील असा दावा सहारा समूहाने केला होता.त्यामुळे पैसे जमा न केल्यास सहारा समुहाच्या लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
समभागधारकांचे 24,000 कोटी रुपये परत करावे यासाठी सेबीने न्यायालयामध्ये सुब्रतो रॉयविरोधात धाव घेतली होती. मार्च 2014 मध्ये पहिल्यांदाच सुब्रतो रॉयला अटक करण्यात आली होती. छोट्या गुंतवणूकदारांना खोटे बाँड विकून रॉय यांनी हजारो कोटी रुपये कमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गुंतवणूकदारांची रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकाच्या खात्यामध्ये जमा करण्याऐवजी सेबी-सहाराच्या खात्यात ती जमा करावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायलयाने दिले होते.