तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवामध्ये पार पडलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात उपहिन्दकेसरी पै. बालारफीक शेख यांनी उपमहाराष्ट्र केसरी पै. सचिन येलभर यास घिस्सा डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस व चांदीची गदा पटकविली. तळेगाव दाभाडे येथे पार पडलेल्या जंगी कुस्त्याच्या आखाड्यात निकाली कुस्त्याचे मैदान भरविण्यात आले होते. यामध्ये एकूण 50 कुस्त्या निकाली झाल्या. त्यामध्ये एकूण साडे सहा लाखाचे रोख बक्षीस देण्यात आले.
तळेगाव केसरी पै. जाधव यांचा सत्कार
या मैदानात कुस्ती क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते. यामध्ये ऑलिम्पिकवीर मारुती आडकर, चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, तानाजी काळोखे, दशरथ पवार, तळेगाव केसरी अशोक जाधव, अशोक भेगडे सह मान्यवर उपस्थित होते. या आखाड्यात दोन महिलांनीही कुस्त्या केल्या. तळेगाव केसरी पै.अशोक जाधव यांचा गावकीच्या वतीने कुस्तीभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाचे स्वरूप पुणेरी पगडी, तलवार, सन्मानचिन्ह असे होते. आमदार बाळा भेगडे, मारुती आडकर, चंद्रकांत सातकर, बबनराव भेगडे, शंकरराव भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, संभाजी राक्षे, राजेंद्र मिरगे, उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत भेगडे व पदाधिकारी उपस्थित होते. पंच म्हणून आमदार बाळा भेगडे, अशोक जाधव, बाळतात्या भेगडे, राजेंद्र मिरगे, बाळासाहेब सातकर, नारायण भेगडे, बाळासाहेब सरोदे, शंकर कंधारे आदींनी कामकाज पाहिले.