दुसर्या महायुद्धापासून शीतयुद्धाला सुरुवात झाली, त्याचबरोबरीने हे महायुद्ध क्रूरकर्मा हिटलरसाठीही ओळखले जाते. दूराग्रही, सनकी हुकूमशहा. ज्यू वंशियांना संपविण्यासाठी याने अनेक ठिकाणी गॅस चेंबर उभारले होते. त्यामध्ये कोंडून लोकांना ठार केले जायचे. त्यात कित्येक मेले, कित्येक वाचले. हिटलर संपला पण हे गॅस चेंबर तेव्हाचा क्रूर इतिहास सांगण्यासाठी अवशेष रुपात तेवढे शिल्लक ठेवले गेले आहेत. आपला इतिहास किती भयानक होता हे पुढील पिढीला माहित हवे. भारतात भोपाळमधील गॅस गळतीची घटना अशीच गाजली होती. एका क्षुल्लक चुकीची जबर किंमत तेव्हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना भोगावी लागली. आजही त्याचे दुष्परिणाम भोपाळमधील काहींमध्ये आढळतात असे म्हणतात. इतिहास भयानक आहे. असो, इतिहासातून थोडे वर्तमानातही डोकावू या. जळगावचा विषय करूया. आपल्याकडे कोण हिटलर आहे अथवा नाही हे नंतर ठरवूया मात्र, त्या आधी परिस्थितीचे अवलोकन जरूर करूया. जळगावकर रोज कणकणाने मरताहेत. कटू आहे, पण सत्य आहे. याला जबाबदार कोण ? महापालिका प्रशासन, सत्ताधारी/विरोधक ? शहरात दररोज 300 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. हा कचरा जातो कुठे ? असा प्रश्न किती जणांना पडतो ? मनपाचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात आव्हाणे शिवारात 6 हेक्टर जागेवर कचर्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारला गेला होता. त्याचे लोकार्पण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अजिंठा विश्रामगृहातून करण्यात आले होते. शहरातील दैनंदिन कचर्यावर या ठिकाणी प्रक्रिया केली जाईल, त्यातून कारखान्यांना आवश्यक जळाऊ ठोकळे, पुनर्वापर होऊ शकणारी उत्पादने तयार होतील अशी योजना होती. काही दिवस हा प्रकल्प सुरळीत चालला पण नंतर त्याला घरघर लागली. पुढे जाऊन हा प्रकल्प पूर्णपणे मोडीत निघाला. या प्रकल्पाच्या जागेत 48 कोटी रुपये खर्चून नवीन प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आहे. तोही अद्याप मार्गी लागलेला नाही. कोणाचे तरी घोडं पेंड खात असावे. पण प्रकल्प बंद आहे म्हणून शहरातून कचरा उचलला जाणे थोडीच थांबणार ? गेल्या आठ ते नऊ वर्षात या ठिकाणी तब्बल 80 हजार मेट्रीक टन कचर्याचा डोंगर तयार झाला आहे. आज परत त्यात 300 मेट्रीक टन कचर्याची भर पडलेली असेल. या कचर्याच्या ढिगातून मिथेन वायूची निर्मिती होते. तो सातत्याने पेट घेत राहतो. मध्यंतरी कचर्यात स्फोटदेखील झाले होते. हा मिथेन वायू अतिघातक. ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना आपण दरवेळी ऐकतो त्याला कारणीभूत जे घटक आहेत त्यामध्ये मिथेन हा वायूही आहे. आव्हाणे शिवारातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या लगतच्या भागात मोठा रहिवासी भाग आहे. कचरा पेटण्यामुळे जो धूर निर्माण होतो तो वार्याबरोबर या रहिवासी भागात पसरतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, जीव गुदमरणे, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम, अस्वस्थ वाटणे आदी त्रास या भागातील लोकांमध्ये दिसून येत आहेत. हे लोक तक्रारी करून थकले आहेत. मध्यंतरी मनपाचा कचर्याचा प्रकल्प दुसरीकडे हलवा म्हणून सूरही निघाला होता. बरे हा केवळ जळगावपुरता प्रश्न नाही तर आव्हाणे गावातील लोकही कचरा प्रकल्पामुळे वैतागले आहेत.
या समस्येवर मध्यंतरी हरित लवादाकडे दाद मागण्याचे घाटत होते. त्यात महापालिका आयुक्त, महापौर प्रतिवाद होऊ शकले असते पण पुढे काही घडले नाही, त्यामुळे हा विषय तेथेच संपला. या प्रकल्पाजवळूनच सुरत लाईन, नवीन चारपदरी महामार्ग जातो. त्यामुळे प्रवाशांनाही या प्रकल्पाचा थोडावेळ का होईना त्रास होणार आहे. वारा तिकडे फिरला म्हणजे त्यापाठोपाठ कचर्यातला धूरही जाईल. महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांनी मनात आणले, तर नवीन कचरा प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लागू शकते परंतु, तसे होताना तूर्तास दिसत नाहीत. यामध्ये कोणाला काही हवे आहे का ? हे कळायला मार्ग नाही. मनपाचा बंद पडलेला प्रकल्प म्हणजे एक प्रकारे पॉइझन फॅक्टरीच ठरत आहे. प्रकल्पाच्या लगत जे रहिवासी आहेत तेथील लोकांचे आयुष्य रोजच्या प्रदूषणामुळे कणाकणाने कमी होत आहे. हे एक प्रकारचे स्लो पॉइझनिंगच म्हणावे का ? याचे वैषम्य महापालिकेला कसे वाटत नाही ? सत्ताधारी-विरोधक, प्रशासन सारेच एवढे निगरगट्ट कसे ? हिटलरची प्रतिमा चांगली नाही. त्याने तर उघडपणे नरसंहार केला. त्यामुळे आज कोणी हुकूमशहासारखा वागत असला, तर त्याला हिटलरची उपमा दिली जाते. जळगाव महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासन यांनी हिटलरच्या पंगतीत जाऊन बसू नये. निर्णय तुमच्या हातात आहे. जळगावकरांचे भले करायचे, की पुढच्या पिढीने जळगावच्या महापालिकेतही हिटलर होता, असे म्हणावे यापैकी कशाची निवड करायची हे ठरविण्याची वेळ आली आहे.