पुणे । वाचकांना तब्बल 64 वर्षे सेवा देणारे प्रसिद्ध पॉप्युलर बुक हाऊस बंद होणार असून त्याजागी लवकरच नव्या रूपात नवी सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र नवीन सेवा कशा प्रकारची असेल याबद्दल ‘पॉप्युलर’कडून माहिती दिलेली नाही.
पुण्यातील पॉप्युलर बुक हाऊस हे अनेक पुस्तकप्रेमी, वाचक तसेच लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल आदींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि हक्काचे ठिकाण. सर्व प्रकारच्या वाचकप्रेमींना अनेक सुविधा पुरविल्या. तीन ते चार पिढ्यांशी जोडले आहे. क्रीडा, लेखन, संगीत, मॅनेजमेंट अशा क्षेत्रातील दिग्गजांची पॉप्युलर ही पहिली पसंती होती. पॉप्युलरतर्फे आयोजित ‘दिवाळी धमाका सेल, ‘न्यू इयर सेल’, ‘वन डे सेल’ हेही खूप लोकप्रिय होते. वाचकांसाठी ती पर्वणीच असायची. जगप्रसिद्ध ‘टाइम न्यूजवीक’ या साप्ताहिकाचे पॉप्युलर मुख्य वितरक होते. या सेवेत एकदाही खंड पडला नाही. पुण्यातील पहिले ऑनलाइन बुक स्टोअर्सही पॉप्युलरनेच सुरू केले होते. मात्र त्यात त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. काळानुसार पॉप्युलरने सीडी, डिव्हिडी यांचीही सेवा ग्राहकाला पुरवली. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘पॉप्युलर’ने ग्राहकांशी नाळ जोडून ठेवली.
लवकरच दुसरा व्यवसाय
पॉप्युलरचे सुनील गाडगीळ म्हणाले, लोकांच्या गरजा बदलल्यामुळे पुस्तकांचा खप पूर्वीसारखा होत नाही. त्यामुळे या व्यवसायात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आम्ही पॉप्युलर बुक हाऊस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच जागेवर आम्ही लवकरच दुसरा व्यवसाय सुरू करणार आहोत.