पटना: देशात वाढत्या बलात्कारास पॉर्न साईट जबाबदार असल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून, अशा पॉर्न वेब साईट्स तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. तसंच अशाप्रकारच्या घटनांमुळे जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे. अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. हे दु:खदायक असून हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.
आजकाल मोठ्या प्रमाणात इंटरनेटपर्यंत मुलांची पोहोच वाढली आहे. त्यामुळे मुलं आणि युवक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अश्लिल मजकुर तसंच हिंसक गोष्टी पाहत आहेत. याच्याच प्रभावामुळे अशा घटना घडत असतात, असे नितीश कुमार यांनी पत्रात नमूद केलं आहे. अनेक घटनांमध्ये त्या घटनेचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरही टाकण्यात येतात. विशेषत: अल्पवयीन किंवा युवकांवर अशा प्रकारच्या मजकुराचा परिणाम होत असतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
अशा प्रकारच्या डेटामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसंच महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.