पॉलिशचा बहाणा, पाच लाखांचे दागिने लंपास

0

पाचोर्‍यात अनोळखी भामट्यांनी केली वयोवृद्धेची फसवणूक ; गुन्हा दाखल

पाचोरा– पॉलिशच्या बहाण्याने चोरट्यांनी हात की सफाई दाखवत सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी शहरातील देशमुखवाडी भागात घडली. 30 ते 35 वयोगटातील दोन अनोळखी युवकांनी उजाला कंपनीच्या पावडरने आम्ही दोन मिनिटात दागिने चमकावून देतो, असे सांगत वंदना शरदचंद्र काबरा (67) या वयोवृद्धेकडील सुमारे साडेचार लाखांचे दागिने अवघ्या पाच मिनिटात लांबवून पोबारा केला. दरम्यान, वयोवृद्धेला भामट्यांनी गुंगीचे औषध दिल्याचाही संशय आहे.

हात चलाखी दाखवत दागिने लंपास
देशमुखवाडी भागातील रहिवासी तथा प्रकाश टॉकीजचे मालक मनीष काबरा यांच्या मातोश्री वंदना शरदचंद्र काबरा (67) या घरी असताना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास 30 ते 35 वयोगटातील दोन युवकांनी येत आम्ही उजाला कंपनीतर्फे आलो असून तुमच्याकडील दागिने दोन मिनिटात चमकावून देऊ, असे सांगत विश्‍वास संपादन केला. काही भांडे चमकवून दिल्यानंतर गॅसवर कुकर ठेवण्यास सांगून चार तोळे वजनाच्या व दोन लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या, दिड लाख रुपये किंमतीचा डायमंड हार तसेच एक लाख रुपये किंमतीची डायमंडची अंगठी कुकरमध्ये टाकून दोन मिनिटात तुम्ही कुकर खाली उतरवा, असे सांगून भामटे पसार झाले. काही वेळेनंतर वृद्धेला आपण फसवले गेल्याचे लक्षात आले. सुमारे पाच लाखांवर किंमतीचे दागिने घेऊन भामटे पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.