जळगाव- जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानवविकास कार्यक्रमांतर्गत पॉलीमर बेंच उपलब्ध करुन देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात ७ निवीदा प्राप्त झाल्या असून बाजारभावापेक्षा निवीदेतील बेंचची किंमत जादाने दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या निवीदेला शिक्षण समिती सदस्यांनी विरोध केला असून किंमतीसंदर्भात सीईओ शिवाजी दिवेकर यांच्यासोबत बैठक घेऊन निवीदाधारकांशी चर्चा केली जाणार असल्याचे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी सांगितले.
जि.प. शिक्षण समितीची बैठक सभापती पोपट भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, सदस्य गजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, राष्ट्रवादीचे रविंद्र नाना पाटील, नंदा पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाभरातील जि.प. शाळांचा आढावा घेण्यात आला.
जि.प.च्या माध्यमातून मानवविकास कार्यक्रमांतर्गत पॉलीमर बेंचची निवीदा काढण्यात आली आहे. यात सात निवीदा प्राप्त झाल्या असून सर्वात कमी किंमतीच्या निवीदेला मान्यता देण्यात आली आहे. मात्र बाजारभावापेक्षा या बेंचची किंमत अधिक आहे. यात ५ हजार ८०० रुपये दराप्रमाणे बेंचची किंमत लावण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रविंद्र पाटील यांनी आक्षेप घेत किंमतीबाबत फेरविचार व्हावा अशी मागणी केली होती. आज झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीतही समिती सदस्यांनी या बेंचच्या किंमतीला विरोध केला.
१७ शाळांची दुरुस्ती करणार
वादळी वार्याने जिल्ह्यातील १७ शाळांचे नुकसान झाले होते. यात काहींची पडझड तर काहींचे पत्रे उडाली होती. अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक मागविण्यात आले असून या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्याच्या सुचना सभापती भोळे यांनी केल्या.
पोषण आहाराची गुणवत्ता पारखुन घ्यावी
जिल्ह्यात काही शाळांमध्ये पोषण आहाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे गटशिक्षाधिकारी व अधिक्षकांनी दिलेले नमुने हे मुख्याध्यापकांना देऊन या नमुन्यानुसारच धान्य स्विकारण्याचे आदेश सभापतींनी दिले. तसेच धान्याचा पुरवठा करणार्या प्रत्येक गाडीत वजनकाटा आवश्यक असून धान्य मोजूनच ते माल ताब्यात घेण्याच्या सुचनाही गटशिक्षाधिकार्यांना यावेळी करण्यात आल्या.
अभ्यास केंद्राच्या तपासणीचे आदेश
जिल्ह्यात मानवविकास कार्यक्रमांतर्गत सात तालुक्यांमध्ये ३८ अभ्यास केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे हे केंद्र योग्यरित्या सुरु आहेत किंवा नाही, त्यात विद्यार्थ्यांसाठीची व्यवस्था, कर्मचारी वेळेवर हजर राहता कि नाही याची तपासणी करण्यात यावी, काही त्रुटी आढळल्यास कारवाई करण्याच्या सुचना सभापतींनी केल्या.
सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी करणार
जि.प. शाळांमध्ये डिजीटल सुविधा करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात विज पुरवठा वारंवार खंडीत होणे तसेच दुर्गम भागात विज पुरवठा न पोहचणे आदी कारणांमुळे डिजीटल उपकरणांचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे या शाळांमध्ये सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रत्येक गटात दोन शाळा या प्रकल्पात जोडण्यात येतील. यासाठी २० लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला असून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
चोपडा गटशिक्षणाधिकार्यांची चौकशी
जिल्ह्यात शिक्षक समायोजन प्रक्रियेत १४ तालुक्यात प्रक्रिया पार पडली आहे. मात्र चोपडा तालुक्यातच गटशिक्षणाधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे समयोजन रखडले असून त्यांची चौकशीचे आदेश सभापतींनी दिले. यासंदर्भात जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी सर्वसाधारण सभेत हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी केली होती.