धुळे। शहराजवळ असलेल्या 12 एकरावरील पॉलीहाऊसला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण पॉलिहाऊस जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले आहे. शहरातील देवकर परिसरात राहणार्या अॅड. आनंद जगदेव यांच्या मालकीचे नगावबारीजवळ 12 एकर क्षेत्रात जवळपास 15 वेगवेगळे पिकांसाठी पॉलिहाऊस उभारले आहेत. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास या पॉलिहाऊसला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण पॉलिहाऊस जळून खाक झाला आहे.
10 बंबांच्या मदतीने नियंत्रण
जगदेव आनंद यांच्या शेतापासून काही अंतरावरती वीज कंपनीची डीपी आहे. शॉर्टसर्कीटमुळे या डीपीला आग लागली आणि काही क्षणात पसरत गेली असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. जोरदार वार्यामुळे आणि कडक उनामुळे व कोरड्या गवताला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत पॉलिहाऊस सह ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, ठिबक सिंचनासाठी वापरल्या जाणार्या नळ्या उभी पिके आगीत खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमनचे 10 बंब मागविण्यात आले होते, अग्निशमन पथकांनी अथक प्रयत्नातून आगीवरती नियंत्रण मिळवले.