‘पॉस मशीन ‘ लवकरच खानदेश आणि मुंबईतही!

0

मुंबई (निलेश झालटे):- महाराष्ट्र सरकार आज प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांतिकडे अग्रेसर होताना दिसत आहे. रेशनकार्डांच्या अनियमिततेमुळे आणि होणाऱ्या घोळामुळे शासनाने रेशन माल वितरण प्रणालीसाठी विकसित केलेल्या ‘पॉईंट ऑफ सेल’ अर्थात ‘पॉस मशीन’ प्रणालीद्वारे सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रांजेक्शन होत असल्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाकडून मिळाली आहे. अवघ्या 6 महिन्याच्या काळात जवळपास 75 टक्के मशीन लागल्या गेल्या आहेत. तुरळक आकडे वगळता मुंबई आणि खानदेश विभागात अद्याप मशीन लागलेल्या नाहीत मात्र 30 जूनपर्यंत या दोन्ही विभागात देखील 100 टक्के मशीन लागल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. डिजिटल क्रांतीतल्या अनेक योजना सामान्यांना न समजल्यामुळे बॅकफूटवर पडत असताना आता रेशनिंग प्रणालीतील या महत्वाच्या योजनेची कार्यवाही कशी होते? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

गैरव्यवहारावर आळा बसणार?
रेशन दुकानांमध्ये होणारे गैरव्यवहार आणि कामाच्या प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी शासनाकडून ‘पॉईंट ऑफ सेल’ अर्थात ‘पॉस मशीन’ हे डिजिटल माध्यम आणले आहे. या प्रणालीद्वारे अन्नधान्य वितरण करण्यासाठी रेशन दुकानदारांना संपूर्ण महाराष्ट्रात 1 जानेवारीपासून सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत म्हणजे 6 महिन्यात 35 हजार मशीन लावल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण 51 हजार 363 ‘पॉस मशीन’ प्रणाली बसविण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केलेले आहे. या प्रणालीचालाभ 1 कोटी 47 लाख रेशनकार्डधारकांना आणि 7 कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे. या प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तीन खाजगी कंपन्यांना तीन वर्षासाठी जबाबदारी दिलेली आहे.

दिवसाला लाखभर ट्रांजेक्शन
सद्यस्थितीत प्रत्येक दिवसाला सरासरी लाखभर व्यक्ती ट्रांजेक्शन करत असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आतापर्यंत या प्रणालीच्या माध्यमातून 4,666.11 मेट्रिक टन गहू, 2,980.14 मेट्रिक टन तांदूळ तसेच 307.20 मेट्रिक टन साखर विक्री केली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत क्षणाक्षणाला माहिती अपडेट केली जात असून सविस्तर माहिती देखील महाफूड डॉट कॉम या पोर्टलवर देखील उपलब्ध करून दिली आहे. येत्या काही दिवसात लाभार्थ्यांकडून दुकानदारांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक सॉफ्टवेयर विकसित केले जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा आघाडीवर, पुणे पिछाडीवर!
आतापर्यंत सर्वाधिक 2564 मशीन ह्या पुणे जिल्ह्यात वितरित केल्या आहेत. पुण्यानंतर यवतमाळ 2069, नांदेड 2049, अमरावती 1978, बीड 1972 या जिल्ह्यांचा सर्वाधिक मशीन वितरणात पहिला क्रमांक आहे. ट्रांजेक्शन करण्यात मात्र कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1573 मशीनद्वारे 1 लाख 91 हजार 929 ट्रांजेक्शन झाले आहे, मालाची विक्री करण्यात देखील कोल्हापूर आघाडीवर आहे. खुद्द विभागाच्या मंत्रांच्या पुण्यात मात्र 2564 मशीन असूनही अद्याप केवळ 2578 ट्रांजेक्शन झाले आहेत. नाशिक, मुंबई आणि कोकण विभागात अद्याप या मशीन लागलेल्या नाहीयेत. 30 जूनपर्यंत उर्वरित भागात या मशीन लागणार आहेत.