जळगाव। बि-बियाणे विक्रेत्यांना शेतकर्यांना रासायनिक खत विक्री करताना विक्रेत्याला संबंधित शेतकर्यांचे अंगठ्याचे ठसे आणि आधार क्रमांक घ्यावे लागणार आहे. पॉस मशीनवर हाताच्या ठसे घ्यावे लागणार आहे. सर्व बियाणे विक्रेत्यांना पॉस मशिन सक्तीचे करण्यात आले आहे. शासनाने खत विक्रीची नवीन प्रणाली जूनपासून सक्तीची करण्याची घोषणा केली आहे. मात्र, विक्रेत्यांना अद्यापही पॉस मशिन उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. त्यामुळे बियाणे विक्रेत्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना यापुढे शेतकर्यांना थेट खते विक्री केल्यानंतरच खतांचे अनुदान मिळणार आहे. राज्यात नाशिकसह काही जिल्ह्यात या मशीनचे प्रायोगिक वापर झाला आहे. जळगाव जिल्ह्यात येत्या जूनपासून या मशीनची विक्रेत्यांना सक्ती करण्यात आली आहे.
आधीच बियाणे खरेदीकडे पाठ
वातावरणातील तापमानाची तिव्रता अधिक असल्याने तसेच जिल्हा बँकेमार्फत कर्ज वितरणास उशीर आदी कारणामुळे शेती लागवड लांबणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरविली आहे. शेतकरी बियाणे खरेदीसाठी बियाणे विक्रेत्यांकडे येत नसल्याने बियाणे दुकानांवर शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे बियाणे विक्रेत्यांचे करोडोचे नुकसान झाले आहे. आधीच बियाणे विक्रेते संकटात सापडले असतांना पॉस मशिन मिळत नसल्याने त्यात अधिकच भर पडली आहे.
1367 विक्रेत्यांना मशिन
संपूर्ण राज्यभरासाठी हा निर्णय असून लिंक वेल आणि अॅनॉलॉजिक या कंपन्यांना पॉस मशीन (पॉइंट ऑफ सेल) पुरवण्याचा ठेका देण्यात आला आहे. जिल्ह्यात 1367 विक्रेत्यांना हे मशीन दिले जाणार आहेत. राज्यात हा आकडा 19 हजार 366 मशीन एवढा आहे. यंत्रणेसाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रात स्वतंत्र अधिकारींची नियुक्त केली आहे. जिल्ह्यात 16 पथकाची नेमणुक करण्यात आली आहे.