आपली मुले काय करतात हे गरिबांना कळत नाही आणि नवश्रीमंतांकडे ते जाणून घेण्यासाठी वेळ नाही, राजकीय यंत्रणांना हा आयता फौजफाटा मिळतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या करिअरपलीकडे दुसरे बघता येत नाही. इथले समाजसेवक फॉरेन फंडिंगच्या नादात स्वतःला ग्लोबल करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ज्यात सेक्स अपील नाही अशा विषयावर वेळ देण्याची आता कुणाची तयारी उरली नाही. या पार्श्वभूमीवर पोखरणारी तरुणाई ही देशाची ठसठसणारी जखम बनत जाणार आहे हा कैलास सत्यार्थी यांनी दिलेला इशारा आपल्या देशाला नाकारून चालणार नाही, त्याचे कायमच स्मरण ठेवले पाहिजे.
उडता पंजाब हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला खुद्द पंजाबमधून मोठा विरोध झाला. भाजप-अकाली दल सरकार या विरोधाच्या अग्रभागी होते. अमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे पंजाबची तरुण पिढी कशी उद्ध्वस्त झाली याचे चित्रण उडता पंजाबमध्ये असल्याने आपल्या सरकारची पोलखोल होऊ नये हा त्यामागचा हेतू होता हे आता उघड झाले आहे. अफिम, कोकेन, एलएसडी असल्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात सध्या आवक होते आणि या व्यवहारात पंजाबमधील अनेक राजकीय नेते गुंतले आहेत. त्यामुळे पंजाबच्या बदनामीची ढाल पुढे करून या चित्रपटाला विरोध झाला शेवटी सत्य काय ते लोकांना कळले आणि पंजाबची वस्तुस्थिती जगापुढे आली. एका पाहणीनुसार सीमेपलीकडून दररोज पंजाबमध्ये सरासरी दीड हजार कोटींचे अमली पदार्थ पाठवले जातात, नंतर ते देशभर वितरित केले जातात, पंजाबची अर्ध्यापेक्षा जास्त अर्थ व्यवस्था आता याच धंद्यावर आधारलेली आहे असे मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंजाबची आताच आठवण येण्याचे कारणही तसेच आहे. मागील आठवड्यात लुधियाना शहरात सैनिक भरतीची प्रक्रिया सुरू होती. जवळपास एक हजार तरुण भरतीसाठी मैदानावर हजर होते, सायंकाळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक धक्कादायक सत्य पुढे आले की त्यापैकी एकही तरुण सैन्य भरतीच्या शारीरिक क्षमतेचा नाही. भल्लिसिंघ विर्क नावाच्या अधिकार्याला तर या वास्तवाचा झटकाच बसला, त्याने तत्काळ आपला अहवाल वरिष्ठांना दिला, आता त्यावर विचारमंथन वगैरे केले जाईल, निवडणुकांच्या वातावरणात याकडे बघण्याची कुणाला फुरसद मिळालीच तर काही उपाययोजना किंवा सरकारी सारवासारवसुद्धा होईल. परंतु, सैन्य भरतीचे वास्तव डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेले आहे. ज्या भारतीय सैन्याला पंजाबच्या जवानांवर, त्यांच्या भरदार शरीरयष्टीवर गर्व होता, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा देशभर गायल्या जात होत्या ते सगळे येणार्या काळात दंतकथेचा भाग तर होणार नाही ना? अशी भीती वाटत आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी व्यसनाच्या आहारी जात आहे. घरापासून दूर राहणार्या दर दुसर्या तरुणांमागे एकाला कोणते तरी व्यसन जडले आहे. सगळे वसतिगृह आणि युथ कॅम्पस चालवणार्या यंत्रणा यामुळे चिंतेत पडल्या आहेत. व्यसनाचे विविध आविष्कार शोधले जात आहेत, आर्थिक कुवतीप्रमाणे त्यांचा आस्वाद घेतला जात आहे. यात धक्कादायक असे की तरुणींचा टक्कासुद्धा वाढत आहे. स्त्री-पुरुष समानतेचा याबाबतीत जरा अधिक जयघोष होताना दिसतो आहे. तंबाखू सेवन किंवा सिगारेटचे आता पालकांनासुद्धा काहीच वाटेनासे झाले आहे. परिणामी, बाहेर शिकणार्या 70 टक्के तरुणी लेडीज सिगारच्या आहारी गेल्या आहेत. रात्री अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून चहाचे रतीब आणि सोबतीला सिगारेटची पाकिटे संपवली जात आहेत. ज्यांना एवढ्यावर किक बसत नाही ते पुढचे पाऊल टाकायला मोकळे आहेत. बायकी मद्य म्हणून हिणवले जाणारे वोडकासारखे प्रकार तरुण जवळ करताना दिसत आहेत. आपल्या चित्रपटांनी सगळ्यांना सौंदर्याचे वेड लावले आहे. तरुणी झिरो फिगर आणि तरुण सडपातळ होण्याच्या प्रयत्नात आहेत शिवाय जागतिकीकरणाची फळे असणार्या फूड मॉल्सची मालिकाच त्यांच्या पुढ्यात उपलब्ध झाल्यामुळे ब्रांडेडचे मोठे आकर्षण काही केल्या कमी होत नाही या सगळ्यांचा परिणाम तरुणाईवर होताना दिसतो आहे. जे तरुण थोडाफार आदर्शवाद घरून येताना घेऊन येतात, काही महिन्यांच्या हॉस्टेल संसर्गात या आदर्शाच्या चिंध्या होतात किंवा त्या करण्यासाठी सगळे तुटून पडतात. आपल्यावर मागासलेपणाचा शिक्का पडणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत प्रसंगी काहीही ट्राय करायला ही पिढी मागेपुढे पाहत नाही, ही कसरत केवळ महानगरात नव्हे, तर आता तालुक्याच्या शहरातही केली जाते. अमेरिकेला हा संसर्ग होऊन बराच काळ लोटला आता आपण त्याचे परिणाम भोगत आहोत.
अमेरिकेत तरुणाई भरकटली आहे, तिथे संस्कृती नावाची कोणतीच वस्तू नाही म्हणजे ते संस्कृतीहीन आहेत असे आरोप करून आपण आजवर आपली समजूत काढीत आलो आहोत. आता मात्र संस्कृतीसंपन्न असणार्या आपल्या देशातील तरुणाई बघून दातखीळ बसण्याची वेळ आली आहे. आपली मुले काय करतात हे गरिबांना कळत नाही आणि नवश्रीमंतांकडे ते जाणून घेण्यासाठी वेळ नाही, राजकीय यंत्रणांना हा आयता फौजफाटा मिळतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या करिअरपलीकडे दुसरे बघता येत नाही. इथले समाजसेवक फॉरेन फंडिंगच्या नादात स्वतःला ग्लोबल करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ज्यात सेक्स अपील नाही अशा विषयावर वेळ देण्याची आता कुणाची तयारी उरली नाही. या पार्श्वभूमीवर पोखरणारी तरुणाई ही देशाची ठसठसणारी जखम बनत जाणार आहे, हा कैलास सत्यार्थी यांनी दिलेला इशारा आपल्या देशाला नाकारून चालणार नाही, त्याचे कायमच स्मरण ठेवले पाहिजे.