मनोर । पालघर तालुक्यातील पोचाडे-तामसई ग्रामपंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक गेल्या दिड महिन्यापासून आजारपणाचे कारण सांगून कामावर येत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. कामानिमित्त ग्रामस्थ ग्रामसेवकास फोन करतात मात्र ते फोन ही उचलत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. पेसाअंतर्गत कामे ही रखडल्याने येथील ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे. ग्रामसेवक आजारी असल्याचे सांगून दीड महिन्यापासून गैरहजर असल्याने त्यांचा भार शिपाई प्रीती गोवारी यांच्यावर सोपावण्यात आला आहे. मात्र त्यांना अधिकृतपणे कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. या बाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. तर सरपंच यांचे ग्रामपंचायतीवर दुर्लक्ष आहे. सतत गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर योग्य कारवाई करुन त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक द्यावा अर्शी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामपंचयतिला ग्रामसेवक नसल्याने विद्यार्थी आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणी येत आहेत, तरी त्वरित ग्रामसेवक नेमणुक झाली नाही तर आम्ही आंदोलन करु.
– ग्रामस्थ
अगोदर असलेले ग्रामसेवक ग्रामस्थांना नको होते म्हणून श्री गडग यांची नेमणुक केली मात्र त्यांची बदली झाली आहे, म्हणून आम्ही दोन दिवसात नवीन ग्रामसेवक देऊ.
– श्री जाधव, गटविकास अधिकारी पालघर