नवी दिल्ली : दिल्ली, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह एकूणच 8 राज्यांतील 10 विधानसभा जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात 10 पैकी तब्बल 5 जागा भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातील दोन्ही जागांवर तसेच मध्य प्रदेशातील अटेर या जागेवर काँग्रेसने विजय मिळविला. तर, तृणमूल काँग्रेसने आणि झामुमोने प्रत्येकी एक-एक जागा जिंकली आहे. मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे 9 एप्रिल रोजी मतदान पार पडले. तर, जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग येथील लोकसभा जागेवर हिंसाचाराच्या सावलीत गुरुवारी मतदान झाले.
दिल्लीत आपचे डिपॉझिट जप्त
दिल्ली विधानसभा पोटनिवडणूक भाजप व आप या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. यात भाजपने 51.99 टक्के मतांसह प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. 33.23% मतांसह काँग्रेस दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला. तर, केवळ 13.11% मते मिळविणारे आम आदमी पक्षाचे उमेदवार हरजीत सिंग यांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झाली. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्र क्रमांक 39 वर पुन्हा मतदान घेतले जात आहेत. 9 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी हिंसाचार झाल्याने येथे फक्त 7 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे, निवडणूक आयोगाने या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले.