पोटनिवडणुकीत गड राखले!

0

पुण्यात राष्ट्रवादी, नाशिकमध्ये मनसे तर सायनमध्ये सेनेला यश

पुणे/नाशिक/ मुंबई : महापालिका पोटनिवडणुकीत आपले गड राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेला यश आले आहे. पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे 3 हजार 521 मतांनी विजयी झाल्या. नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप उमेदवाराचा धुव्वा उडवत मनसेच्या अ‍ॅड. वैशाली भोसले विजयी झाल्या तर मुंबई महापालिकेच्या सायन प्रतीक्षानगर येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत, शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे 6116 मतांनी विजयी झाले आहेत. एकूणच पोटनिवडणुकीत आपआपले गड राखण्यात या पक्षांना यश आले आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा कोद्रे यांना 8 हजार 991 तर शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 5 हजार 479 यांना मते मिळाली. 3 हजार 521 मतांनी पूजा कोद्रे विजयी झाल्या. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिसून आली. प्रभाग क्रमांक 22 च्या नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत 35 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्‍वर मोळक यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांना 8 हजार 991, भाजपच्या सुकन्या गायकवाड यांना 4 हजार 334 आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 5 हजार 470 एवढी मते मिळाली.

नाशिकमध्ये मनसेच्या इंजिन सुस्साट!
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेविरुध्द शिवसेना अशी लढत झाली. मनसेच्या उमदेवार अ‍ॅड. वैशाली भोसले यांनी 7 हजार 453 मते मिळाली तर सेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण यांना 5 हजार 131 मते मिळाली. भोसले यांच्या विजयाने मनसेने पुन्हा या प्रभागात गड राखण्यात यश मिळविले आहे. मनसेच्या इंजिनने दुसर्‍या फेरीपासून धरलेला सुसाट वेग पाचव्या फेरीपर्यंत कायम होता. येथे सेना-भाजपाचा धुव्वा उडाला आहे. शनिवारी गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. भाजपच्या विजया लोणारी यांना अवघी 4 हजार 810 मते मिळाली. या निवडणुकीत आठ उमेदवार जरी रिंगणात होते तरी मनसे, सेना व भाजपच्या उमेदवारात खरी लढत झाली. अल्प मतदानाचा लाभ मनसेलाच झाला. भाजप तिसर्‍या स्थानावर फेकली गेली. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मनसेने प्रयत्न केले होते. परंतु, शिवसेना व भाजपने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने चुरस निर्माण झाली होती.

सायनमध्ये सेनेचे रामदास कांबळे विजयी
मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत सायनमधील प्रभाग क्रमांक 173 चा आपला गड कायम राखण्यात शिवसेनेला यश मिळाले. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे 6116 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुनील शेट्ये यांचा पराभव केला. नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने मूळचे शिवसैनिक असलेले सुनील शेट्ये यांना उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. पण अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे.