पोटनिवडणुकीत भाजपला 3 जागा

0

चेन्नई : 4 राज्यांत 5 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यामध्ये उत्तरप्रदेश, अरुणाचलच्या तीन जागा भाजपला मिळाल्या. उत्तर प्रदेशच्या सिकंदरा, अरुणाचल प्रदेशच्या लिकाबाली, पक्के-केसांग या जागा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या सबांग जागेवरून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार गीता रानी विजयी झाल्या. तर तमिळनाडूतील आरके नगर जागेवर शशिकला यांचे पुतणे अपक्ष उमेदवार टीटीव्ही दिनाकरण यांचा विजय झाला. तामिळनाडूच्या अम्मा जे. जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती.

अण्णाद्रमुकचा मला पाठींबा
जयललिता यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आरके नगर मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक पार पडली होती. जयललिता यांचा मतदारसंघ असल्याने अण्णाद्रमुकसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय होती. शशिकला यांचे पुतणे आणि अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झालेले दिनकरन हे देखील रिंगणात होते. विजय संपादन करताना दिनकरन म्हणाले, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो तरी अण्णाद्रमुकच्या लाखो कार्यकर्त्यांचा मला पाठिंबा आहे.

भाजप उमेदवार चौथ्या स्थानावर
रविवारी सकाळपासून आरके नगर मतदारसंघात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासून दिनकरन यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे दिनकरन विजयी होणार हे निश्चित असले तरी ते किती मतांनी अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचा पराभव करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संध्याकाळी मतमोजणी संपली आणि दिनकरन यांनी अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचा सुमारे 40 हजार मतांनी पराभव केल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजप उमेदवाराला चौथ्या स्थानावर राहिला.