पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे विजयी

0

राजगुरूनगर : पंचायत समितीच्या पिंपरी बुद्रुक गुणात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मच्छिंद्र गावडे यांनी भाजपचे उमेदवार रामदास मेंगळे यांचा 568 मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या या विजयामुळे खेड पंचायत समितीमधील समीकरणे बदलणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पोटनिवडणुकीत भाजपला आपली जागा राखता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेत आतून भाजपच्या उमेदवाराला मदत केल्यानंतरही भाजप उमेदवाराचा पराभव भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या जिव्हारी लागणारा आहे.

उपसभापतीपदासाठी रस्सीखेच
पिंपरी बुद्रुक गणासाठी रविवारी मतदान झाले. पावसामुळे मतदानाला अल्पप्रतिसाद मिळाला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत सेना-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहावयास मिळाली. गावडे यांच्या विजयामुळे पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या आठ झाली आहे. त्यामुळे एका जागेसाठी काँग्रेसचा धरलेला ‘हात’ सोडणार यात शंका नाही. आता उपसभापतीपदी असलेले काँग्रेसचे अमोल पवार यांच्याबाबत शिवसेना काय निर्णय घेते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर आणि अंकुश राक्षे हे दोघे शर्यतीत आहे. या निकालानंतर शिवसेनेकडून पदाधिकारी बदलाची जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे.