किशोर तरकासे यांनी दिली माहिती
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ अमधील रिक्त जागेसाठी 27 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. 2 ते 9 जानेवारी या कालावधीत उमेदवारी भरण्याचा व स्वीकारण्याची मुदत आहे. दरम्यान निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी दिली. येत्या 27 जानेवारीला मतदान आणि 28 ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीस 2064 मतदार आहेत. 1140 पुरुष आणि 924 महिला मतदार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
हे देखील वाचा
इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत शासकीय कामकाज केले जात आहे. 6 जानेवारीला रविवार सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 10 जानेवारीला अर्जाची छाननी व वैध अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. कोणतेही अपील नसल्यास 17 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात अंतिम मुदत देण्यात आली आहे. माघारीचे मुदतीनंतर एक जागा असल्याने एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज राहिल्यास चिन्ह वाटप त्यानंतर मतदान. 28 जानेवारीला दहा वाजता मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ अ साठी आचार संहिता लागू झाली आहे. या प्रभागातून स्व.माजी नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्यास अथवा त्यांचे पत्नी रुक्मिणी कांबळे यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजप वर्तुळातून होत आहे. याशिवाय या प्रभागातून शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश झोंबाडे, सुहास दुनघव, रामहरी गणगे आदी उमेदवार इच्छुक आहेत. भाजप, शिवसेना व अपक्ष अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रभागातील मतदारांशी संपर्क साधण्याची मोहीम इच्छुकांनी सुरु केली आहे. मोर्चेबांधणी व उमेदवारीसाठी वरिष्ठांशी संपर्क वाढल्याचे दिसून येत आहे.