पोटनिवडणुकीसाठी युतीकडून हिमाली कांबळे यांना उमेदवारी

0

पुणे । प्रभाग क्रमांक 21 साठी 11 ऑक्टेबरला पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी रिपाई, भाजप युतीकडून दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे उपस्थित होते.

दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे हे प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आता त्यांची कन्या हिमाली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रसे, मनसे, शिवसेना राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांशी बोलणी करणार असल्याचे बापट यांनी यावेळी सांगीतले.

आठवलेंशी चर्चा करणार
यापुर्वी आरपीआयने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी कमळ चिन्हावर निवडणुका लढविल्या होत्या. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपच्या चिन्हाचा वापर केला होता. या पोटनिवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे यासाठी खा. रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून प्रश्‍न सोडविणार असल्याचे बापट यांनी सािंंगतले.

अजित पवारांशी चर्चा!
दिवंगत उपमहापौर यांच्या निधनानंतर पोट निवडणूक बिनविरोध करू, असे इतर पक्षातील नेत्यांनी बोलून दाखविले होते. त्या पार्श्‍वभुमीवर सर्व पक्षांशी चर्चा करत आहोत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशीदेखील वेळ पडल्यास चर्चा करणार असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.