पोटाच्या खळगीसाठी भटकंती

0

एरंडोल (रतीलाल पाटील)। सुमारे बाराशे किलोमीटर अंतर पार करून पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ येथील तीन परिवार दरवर्षी एरंडोल येथे रस्त्याच्या कडेला झोपडीत राहून झाडू बनवुन त्याची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अल्पवयीन मुलांना बरोबर घेवून उन्हाची पर्वा न करता गावोगाव फिरून झाडू विकून तीन महिन्यांच्या मुक्कामानंतर सर्व परिवार आपल्या मुळ गावी जावून वडिलोपार्जित असलेली कोरडवाहू शेती करून संसाराचा गाढा हाकत आहेत. छत्तीसगढ या राज्यातील सलाका (जि.बिलासपुर) येथील तीन परिवार अनेक वर्षापासून दरवर्षी एप्रिल महिन्यात एरंडोल येथे येवून झाडू बनवुन ते ग्रामीण भागात विक्री करण्याचे काम करीत आहे. धरणगाव रस्त्यावर शेताच्या कडेला पालापाचोळा टाकून झोपडी तयार करून तिन्ही परिवार याठिकाणी राहत असतात. जवळच असलेल्या शेतातील विहिरीवरून पाणी आणून दगडाच्या चुलीवर स्वयंपाक बनवुन दैनंदिन कामकाजाला हा परिवार सुरुवात करीत असतो.

आकर्षक झाडू बनवितात महिला
शेताच्या कडेला राहत असल्यामुळे साप विंचू सारख्या विषारी प्राण्यांची भीती मनात राहते. मात्र आता या गोष्टींची सवय परिवारातील सर्व सदस्यांना झाली आहे. सलाका येथून येतानांच झाडू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल ट्रक मधून आणून त्याची योग्य ती प्रतवारी करून त्याचे आकर्षक असे झाडू बनविण्याचे काम परीवारातील महिला करीत असतात. लोकनाथ नायक हा परिवाराचा प्रमुख असून सर्व परिवारातील सदस्यांची संख्या सुमारे पंचवीस आहे. या सदस्यांमध्ये पाच जोडपी असून पंधरा लहान मुले आहेत.सर्व परिवाराचा झाडू बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय असून तीन महिने झाडू विक्रीचे काम केल्यानंतर पावसाळ्यात मुळ गावी जावून शेतीचे काम करीत असल्याचे लोकनाथ नायक यांनी सांगितले. तर झाडू विक्रीच्या व्यावसायातूनच घराचा उदरनिर्वाह होतो. दिवसभर मेहनत केल्यानंतर झाडू विक्रीला कुटूंबिय जात असतात.

मुलांना शिकविण्याचा संकल्प : तीन महिने पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात आल्यानंतर गावाकडे असलेल्या मुलांची काळजी असते मात्र कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य त्यांचे समवेत राहत असल्यामुळे आम्ही आमचा व्यवसाय बिनधास्त पणे करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना शिक्षित करून त्याना नोकरीला लावायचा निश्‍चय त्यांनी बोलून दाखविला. झाडू ची खरेदी करताना ग्राहक आमच्या श्रमांकडे न पाहता कमी किमतीत झाडू मागतात त्यावेळी खूप वाईट वाटत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

कामात आले अनेक अनुभव
तीन महिन्यात सर्व खर्च करून सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये शिल्लक राहिल्यानंतर नऊ महिने या पैशांवर आपला कुटुंबाचा प्रपंच ते सांभाळत असतात.मुळ गावाहून परराज्यात रोजगारासाठी येताना फक्त लहान मुलांना बरोबर आणले जाते. तर मोठ्या मुलांना मूळ गावी शिक्षणासाठी ठेवले जाते.दिवसभर वाढत्या तापमानात आरोग्याची कोणतीही काळजी न घेता ग्रामीण भागात झाडू विक्री करतांना अनेक चांगले व वाईट अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी जेवण दिले जाते तर काही ठिकाणी तुच्छतेने देखील पाहिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सकाळी उठल्यावर तयार असलेले झाडू विक्रीसाठी नेले जातात. दुपारी मालविक्री झाल्यानंतर पुन्हा झाडू तयार करण्याचे काम सुरु करणे असा दिनक्रम त्यांचा ठरलेला आहे.