पोराला जातवैधता मात्र बापाला नाही!

0

मुंबई:- राज्यामध्ये जातवैधता प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने लोकप्रतिनिधी तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून 3 महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र देण्याची घोषणा करूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. यावेळी सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांनी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना धारेवर धरले. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी वडिलांना प्रमाणपत्र असल्यावर मुलांना न देण्याबाबत समजू शकतो मात्र मुलाला जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही ही बाब गंभीर असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी देखील आक्षेप घेत बापानेच मुलाला जन्माला घातलेय मग अडचण काय? असा सवाल उपस्थित करत बडोलेंवर प्रश्नांचा भडिमार केल्याने बडोले गोंधळून गेले. सर्व माहिती घेऊन अनियमितता असलेल्या प्रकरणात कारवाई करु आणि लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले.

अजित पवार यांनी राज्यातील जातपडताळणी कामांसाठी मनुष्यबळ कमी असल्याने आणि अनेक समितीवर अध्यक्ष नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत असल्याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने हे सरकारचे अपयश आहे असा आरोप अजित पवार यांनी केला. 36 समित्या असून अध्यक्ष किती आहे? असा सवाल त्यांनी केला. यावर बडोले यांनी 18 पदे भरली असल्याची माहिती दिली. यावर गणपतराव देशमुख यांनी 85 हजार प्रकरणे प्रलंबित असून कधी निपटारा होणार? सवाल केला. यावर पद भर्ती अंतिम टप्प्यात असून वेगाने प्रकरणे निकाली लावली जातील असे बडोले यांनी सांगितले. नगरसेवक निवडून आल्यानंतर 6 महिन्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र होतेय. त्यामुळे त्यांना मुदतवाढ द्या किंवा प्रमाणपत्र आल्यावर त्यांना पत्र घोषीत करणार का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला. यावर दिवसात प्रकरणे मार्गी लावू असे बडोले यांनी सांगितले.

प्रणिती शिंदे यांनी प्रमाणपत्र नसल्याने रिजल्ट दिला जात नसल्याची बाब सभागृहासमोर ठेवली. त्यासाठी त्यांना दंड भरावा लागत आहे. हा दंड परत करून विदयार्थ्यांसाठी वेगळा सेल तयार करणार का? असा प्रश्न केला. 30 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली असून तोपर्यंत त्यांना प्रमाणपत्र देऊ व दंडासंदर्भात विचार करू असे बडोले यांनी संगितले. संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे असून ज्या अधिकाऱ्यामुळे ही प्रकरणे पेंडिग पडली त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल केला. यावर चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन बडोले यांनी दिले. तसेच मुलांना प्रमाणपत्र मिळते मात्र वडिलांना मिळत नाही हा विषय गंभीर असून यावर तपासणी करून कारवाई करू असेही ते म्हणाले.