पोर्टेबल ‘इलिसा’ किटद्वारे होणार गोमांस तपासणी

0

मुंबई: मांसामध्ये गोमांस आहे का नाही, याचा तपास करणाऱ्या पोर्टेबल किटची निर्मिती राज्यातील न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा संचलनालयाने केली आहे. या किटमुळे पोलिसांना मोठी मदत होणार आहे. या नव्या किटमुळे केवळ गोमांसाच्या संशयामुळे होणारी कारवाईदेखील टळणार आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्याच्या आधारे राज्यात बैलांच्या हत्येवरही बंदी घालण्यात आली आहे. गोमांस शोधणाऱ्या इलिसा किटमुळे अवघ्या अर्ध्या तासात मांस हे गोमांस आहे का, ते समजू शकेल, अशी माहिती न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा संचलनालयाचे संचालक के. वाय. कुलकर्णी यांनी दिली. या किटमुळे संशयित मांसाची चाचणी करुन ते गोमांस आहे का, याबद्दलची पडताळणी करता येईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

गोमांस असल्याच्या संशयावरुन करण्यात येणाऱ्या कारवाईवेळी पोलिसांना पोर्टेबल किटची मदत होईल. गोमांस वाहतुकीच्या संशयावरुन अनेकदा वाहने रोखली जातात. यावेळी वाहतूक पोलिसांना पोर्टेबल किट उपयोगी ठरणार आहे. गोमांसाची तपासणी करणाऱ्या एका किटची किंमत ८ हजार रुपये आहे.