पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना न्याय

0

मुंबई । मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील 27 वर्षांपासून निलंबित झालेल्या 565 कामागरांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यवस्थापनासोबत चर्चा केल्यामुळे आता या सर्व निलंबित कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे. रोजगार गमावलेल्या या कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार असल्याने त्यांच्या कुटुंबात आनंद साजरा होत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्यस्थी केल्यामुळे 565 निलंबित कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचे आश्‍वासन मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेयरमन संजय अवस्थी, संजय भाटिया यांनी दिले.

आज मुंबई पोर्ट ट्रस्ट युनियनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी वंदना गवळी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांच्या समस्यांचे निवेदन आठवले यांना देण्यात आले. ना. आठवले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्याशी फोनवर चर्चा करून या सर्व निलंबित कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी सांगितले. त्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष भाटिया यांनी सर्व निलंबित कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी आठवलेंना भेटलेल्या शिष्टमंडळात मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवक वंदना गवळी, प्रदीप गवळी, शिवाजी डोमबाले, विशाल नारनवर, तानाजी यादव, डी मोसेस, वसंतराव आलदर, गणेश आवाड, सदरू अंसारी, उत्तरा कुमार, सुब्रमणि यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्यस्थी केल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या त्या 565 कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तब्बल 27 वर्षे सेवेपासून लांब असलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत रूजू व्हायला मिळत असल्यामुळेही पोर्ट ट्रस्टच्या कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच याबाबत त्यांनी आठवले यांचेही आभार मानले आहेत.