पोर्तुगालसाठी चिली ठरली तिखट

0

सोची । रशियामध्ये खेळल्या जात असलेल्या कॉन्फेडरेशन फुटबॉल स्पर्धेतील पेनल्टी शूट आऊटपर्यंत लांबलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत चिलीने पोर्तुगालचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. बुधवारी झालेल्या या सामन्यातील 120 मिनिटांच्या खेळामध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटने लावण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीचा गोलरक्षक क्लाउडियो ब्राव्होने तीन गोल अडवत संघाला अंतिम फेरीत खेळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. चिलीसाठी अर्तुरो विडाल, चार्ल्स अरंगुज आणि अर्सेनलसाठी फॉरवर्ड जागेवर खेळणार्‍या अ‍ॅल्कसीस सांचेझने गोल नोंदवले.

झंझावती सुरुवात
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी आपला बचाव मजबूत ठेवल्याने खेळाडू चांगलेच आक्रमक झाले होते.सामन्याच्या नवव्या मिनिटालाच सांचेझने दिलेला अप्रतिम पास एडर्वाडो वर्गासच्या अगदी पुढे पडला होता. पण पोर्तुगालचा गोलरक्षक रुई पॅट्रीसीओने तो प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर अर्नाक्यूझने दोन वेळा पहिल्या सत्रात पोर्तुगालचा बचाव भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.