पोलादपूर-दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी बस पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान आंबेनळी घाटात कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला. काळ शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. दरम्यान सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात आल्यानंतर बचाव पथकानं शोधकार्य थांबवले आहे.
दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण शनिवारी सकाळी साडेसहा वाजता दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. सहलीला निघण्यापूर्वी सगळ्यांनी आनंदात फोटो काढले होते. मात्र काहीच तासांच्या आत या सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. बस आंबेनळी घाटात आली असता एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस दरीत कोसळून हा अपघात झाला.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख
मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. यापुढे अशाप्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.