पोलादपूर : मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी स्वत:चे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा व शासनाच्या मतदार जागृती मोहिमेत देखील सहभागी व्हावे. असे आवाहन पोलादपूरचे तहसीलदार शिवाजी जाधव यांनी केले आहे. तालुक्यातील चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मतदार जागृती व नोंदणी कार्यक्रमात पोलादपूरचे तहसीलदार शिवाजी जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
मतदान नोंदणी अर्ज भरण्यास सुरूवात
यावेळी विद्यार्थ्यांकडून मतदान नोंदणी अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलादपूर तहसिल कार्यालयाचे अशोक सुसलादे, राहुल ससाणे, अनिल मुंढेकर, प्रशांत आंबिलकर, अशोक बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जयश्री पाटील-जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.