पोलादपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी कापडे बुद्रुक

0

पोलादपूर । ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याने पोलादपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुपग्रामपंचायत ठरलेल्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच अजय सलागरे यांची पोलादपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड जाहिर करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप यांनी बहुजन समाजाला नेतृत्वाची राजकीय खेळी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानातील कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच अजय सलागरे हे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष झाल्याने राजकीय समीकरणांत ही खेळी वेगळेच स्थान प्राप्त करणारी ठरली आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीसह बोरघर आणि गोवेले या ग्रामपंचायतींची जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये निवड झाल्यानंतर कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच अजय सलागरे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडयांचा विकास झपाटयाने होऊ लागला.

माणिकराव जगताप यांचा धक्कातंत्राचा वापर
यामुळेच पंचायत समितीवर शैलेश सलागरे यांना भरघोस मताधिक्याने विजयी होता आले आणि ते उपसभापतीदेखील झाले.सध्या दुसर्‍यांदा सरपंचपदी विराजमान झालेल्या अजय सलागरे यांना आगामी ग्रुपग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान पुढील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. मात्र, तोपर्यंत मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानातील समावेशामुळे कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडयांतील विद्युत प्रकाश योजना, पाणीपुरवठा योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना अशी कोटयवधी रूपयांची विकासकामे करताना सरपंच सलागरे यांची ’सरपंच,हे फक्त तुम्हीच करू शकता! अशा घोषवाक्यांनी सोशल मिडीयावर तसेच कापडे बुद्रुकच्या हद्दीतील विकासकामांच्या फ्लेक्स बॅनरवर जोरदार चर्चा घडू लागली. या चर्चेवर पोलादपूर पंचायत समितीच्या आमसभेमध्ये कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील विरोधकांनी जोरदार विरोध केला आणि त्यास आमसभाध्यक्ष आ.भरतशेठ गोगावले यांची साथ लाभली होती. यामुळे सरपंच अजय सलागरे हे अधिकच जोरदार चर्चेत आल्याने काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप यांनी अचानक धक्कातंत्राचा वापर करीत बहुजन समाजाला नेतृत्वाची राजकीय खेळी केली.