पोलादपूर तालुक्याचा दुष्काळ हटवणे विद्यार्थ्यांच्या हाती

0

कर्मवीरांच्या 130 व्या जयंतीनिमित्त वार्षिक कार्यक्रम

पोलादपूर-सात नद्या असलेल्या पोलादपूर तालुक्यातील दरवर्षीच्या दुष्काळ अन् पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिकणार्‍या श्रमदानाचे महत्त्व माहिती असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकच असेल. यासाठी लवकरच तालुक्यातील पाणीप्रश्नी आपण अधिक एकत्रितपणे प्रभावी काम करू, अशी अपेक्षा हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जलनायक किशोर धारिया यांनी कर्मवीरांच्या 130 व्या जयंतीनिमित्त कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक कार्यक्रमातील सत्कारमूर्ती म्हणून व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख वक्ते पळचिल येथील स्व.शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस.आर.जैतपाल, तहसिलदार शिवाजी जाधव, सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, सभापती दिपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, नगराध्यक्षा सुनीता पार्टे, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, रयतचे मुख्याध्यापक जे.टी. कांबळे, उपमुख्याध्यापक एम.ए.मुळे, स्थानिय शाळा समितीचे सभापती निवास शेठ, नगरसेविका शुभांगी चव्हाण, प्रीती बुटाला, गणपत जगताप, रामचंद्र साळुंखे, दत्तोपंत साळुंखे, बी.डी.मंडले, हभप मोरे, कॅप्टन दत्ताराम मोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1 हजार रूपये पारितोषिकाच्या निसर्गविषयक स्पर्धा आयोजित करून दहा विद्यार्थ्यांसाठी एकूण 10 हजार रुपयांचा निधी आपण उपलब्ध करू, असे जाहीर केले. यावेळी तहसिलदार शिवाजी जाधव यांनी, महाड तालुक्यातील नाते येथील रयतच्या शाळेचे आपण विद्यार्थी असून शितोळे सरांमुळे आपण दहावी उत्तीर्ण होऊ शकल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी आपले कुटुंब, नातेवाईक, शाळा, गाव आणि समाजाचे ॠण विद्यार्थ्यांनी कायम मानले पाहिजे, असे मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी पळचिल येथील स्व. शांताराम शंकर जाधव न्यू. इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस.आर.जैतपाल यांनी प्रमुख वक्ते म्हणून विचार मांडताना, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केल्यानंतरही हरिपाठ म्हणण्याइतपतच समाजाची प्रगती होताना पाहून कर्मवीरांनी रयतच्या माध्यमातून गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविल्याचे कार्य आज महत्त्वपूर्ण आहे.

संत गाडगेबाबा यांनीही नेहमीच कर्मवीरांच्या या कार्याचे प्रवचन किर्तनामधून कौतुक केले आहे. म.गांधीहत्येनंतर रयतचे थांबवलेले अनुदान तात्काळ सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री खरे यांच्याकडे गाडगेबाबांनी जाऊन आग्रह धरला आणि आर्थिक अडचणीतून रयत शिक्षण संस्था बाहेर आली, अशी माहिती देताना शाहू महाराजांची प्रेरणा असलेल्या कर्मवीरांनी शाहू महाराजांचे कार्य अधिक पुढे नेले. समाजात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीतून विघातक होण्याची नाही तर विधायक कार्याची प्रेरणा घेणारे महान माणूस म्हणून लौकिक प्राप्त करतात, त्यापैकीच पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील होते, अशी माहिती दिली.