पोलादपूर नगरपंचायतीचा खांदेपालट महिला बालकल्याण सभापतीपदा पुरताच !

0

पोलादपूर । पोलादपूर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक सोमवार रोजी झाली असता अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, अपेक्षित खांदेपालट सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये घडून न येता तो केवळ महिला बालकल्याण सभापतीपदापुरताच दिसून आला. या समितीच्या सभापती पदावर सिद्दीका लोखंडे यांची निवड करण्यात आल्याचे तर या समितीच्या उपसभापतीपदी उमेदवारी अर्ज न आल्याने पद रिक्त राहिल्याची माहिती यावेळी पोलादपूर तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली.

अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध
पोलादपूर नगरपंचायतीत पहिल्या निवडणुकीनंतर सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती प्रकाश गायकवाड, पाणीपुरवठा समिती सभापती निलेश सुतार, महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना सवादकर, अर्थ व शिक्षण,क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रसन्ना बुटाला तर सार्वजनिक आरोग्य आणि मालमत्ताकर समिती सभापती उपनगराध्यक्ष उमेश पवार हे कार्यभार सांभाळत असताना केवळ महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना सवादकर यांच्याऐवजी सिद्दीका लोखंडे यांची निवड करण्यात आली.

अर्ज दाखल होण्यापूर्वीच अर्जात त्रूटी उघड
या समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल होण्यापूर्वीच अर्जातील त्रूटी उघड झाल्याने संभाव्य उपसभापती नगरसेविकेला पदापासून वंचित राहावे लागले. तहसिलदार शिवाजी जाधव यांच्यासोबतीने मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी कामकाज पाहिले. यावेळी महिला व बालकल्याण समितीची सदस्य संख्या चार आणि अन्य समित्यांची सदस्य संख्या पाच असल्याची तसेच दिवाबत्ती खाते पाणीपुरवठा विभागाला जोडण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी गाढवे यांनी दिली. स्थायी समितीवर नगराध्यक्षा सुनिता पार्टे यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीचे सभापती प्रकाश गायकवाड यांच्यासह राजन पाटणकर, राजन तथा बच्चू पवार, कल्पना सवादकर, नागेश पवार, पाणीपुरवठा समिती सभापती निलेश सुतार यांच्यासह सिध्देश शेठ, राजन पाटणकर,कल्पना सवादकर, शुभांगी चव्हाण, अर्थ व शिक्षण,क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रसन्ना बुटाला यांच्यासह राजन पवार, संगिता इंगवले, शुभांगी भुवड, महिला व बालकल्याण समिती सभापती सिद्दीका लोखंडे यांच्यासह आयुषी पालकर, अश्‍विनी गांधी, रेखा सोनावणे तसेच सार्वजनिक आरोग्य आणि मालमत्ताकर समिती सभापती उपनगराध्यक्ष उमेश पवार यांच्यासह सिध्देश शेठ, संगिता इंगवले, आयुषी पालकर व सुभाष गायकवाड-हांडे यांची निवड यावेळी तहसिलदार शिवाजी जाधव यांनी जाहिर केली.