पोलादपूर नगरपंचायतीत पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

0

पोलादपूर । नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडासाफ झाल्यानंतर केवळ 2 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने चक्क काँग्रेसचे विरोधीपक्षनेता नागेश पवार यांनाच शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्षाला निष्प्रभ करण्याचा धक्कादायक प्रकार केला. मात्र, तत्पूर्वी नागेश पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजिनामा दिल्याने प्रभाग क्र.16 मध्ये ते शिवसेनेकडून पुन्हा उमेदवार असतील, हे निश्‍चित असताना या प्रभागातील रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 15 जुलैला मतदान जाहिर झाले असल्याने काँग्रेसतर्फे आता या काँग्रेसी जागेवर प्रतिष्ठा पणाला लावली जाते अथवा कसे ते पाहावयास मिळणार असून, शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह सर्वच नेते नागेश पवार यांच्या विजयासाठी रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे.

पोलादपूर नगरपंचायतीचा प्रभाग क्र.16 हा प्रभाग क्र. 16 मध्ये देवळे यांच्या प्लॉटपासून पोलीस वसाहत, मुंबई गोवा हायवेपर्यंत भागामध्ये मतदारसंख्या 141 असून 73 महिला आणि 68 पुरुष मतदार आहेत. हा प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्गातील महिला व पुरूष उमेदवारांसाठी खुला असल्याचे आरक्षण जाहिर झाले. येथील बहुसंख्य मतदार नोकरदार असल्याने आणि ते या प्रभागात वास्तव्यास नसल्याने केवळ 90 ते 120 मतदारच मतदानाचा हक्क बजावतील, अशी अटकळ असताना या प्रभागात मोठ्या प्रमाणात अर्थकारण शिजले.

अपेक्षेप्रमाणेच 116 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि काँग्रेसचे नागेश पवार यांना 55 मते तर शिवसेनेचे प्रसाद सुकाळे यांना 33 व भाजपच्या पिंकी शिंदे गोळे यांना 22 मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महमद मुजावर यांना केवळ 4 मते आणि 2 मते नोटाला गेली. यावेळी शिवसेना आणि भाजपा उमेदवारांच्या मतांची बेरीज ही विजयी काँग्रेस उमेदवार नागेश पवारांच्या मतांएवढी झालेली दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसची मते कुठे गायब झाली, हा भाग नागेश पवार यांच्या मुत्सद्दीपणाचे द्योतक आहे. प्रभाग 16 मधील नागेश पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने होत असलेल्या या पोटनिवडणुकीमध्ये मतदार नागेश पवार यांचे की काँग्रेसचे याबाबत स्पष्ट भूमिका दिसून येणार आहे.

नागेश पवार यांनी सह्याद्रीनगरच्या रस्त्यासाठी स्थानिकांना दिलेला शब्द शिवसेनेने पूर्ण केल्यानेच आ. भरतशेठ गोगावले व रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजिनामा देऊन शिवसेनेमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते प्रवेश केला. यावेळी नागेश पवारांच्या विजयासाठी शिवसेनेकडून निकाराने प्रयत्न करण्याची ग्वाही नागेश पवार यांना ना. गीते यांनी दिली. याचाच परिणाम, नागेश पवार यांच्या विजयात होण्याची चिन्हे दिसून येत असली तरी काँग्रेसकडून ही जागा राखण्याचे प्रयत्नही जोरदार होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.