पोलादपूर । तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्ड्यांनी आता उग्रभयंकर रूप धारण केले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आदळत आपटत प्रवास करावा लागत असल्याचे दृश्य येथे रोजच दिसून येत आहे. गणेशोत्सव काळात पोलादपूर पंचायत समितीच्या उपसभापतींनी हे खड्डे कापडे बुद्रुक गावापर्यंत बुजवून गणेशभक्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरच्या पावसामुळे खड्डयांतील मातीचा भराव वाहून गेल्यानंतर पुन्हा या मार्गावरून प्रवास जिकिरीचा झाला असून पार प्रतापगडच्या देवीभक्तांची प्रचंड गैरसोय होण्याची लक्षणे दिसून येत आहेत. पोलादपूर ते महाबळेश्वर वाई सुरूर या नियोजित राष्ट्रीय महामार्गापैकी सध्या असलेल्या राज्यमार्गाचा सुमारे 22 कि.मी. अंतराचा रस्ता पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे आहे.
रस्त्याच्या दूरवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष!
या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सुरुवातीला या राज्यामार्गावरील ब्रिटिशकालीन मोर्यावजा पूल हे काँक्रीटची कॉलर बसवून रूंदीकरण करण्यात आले. यानंतर लगतच्या डोंगराचा भाग कापण्यात येऊन रस्तेही रूंद करण्यात आले आहेत. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात डोंगराचा भाग कापल्याने दोन वेळा पावसासोबत मातीचे ढिगारे कोसळून रस्त्यावर येत वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. ज्या भागात हे भूस्खलन झाले तेथील रस्ताही कमकुवत असल्याचे तसेच डांबरी रस्त्याला भेगा पडू लागल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता पूर्णत: धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
येत्या काही दिवसांत खड्डे भरण्याचा कार्यक्रम
याबाबत पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या डेप्युटी इंजिनियर देवकाते यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पार आणि प्रतापगडाच्या देवीभक्तांसाठी लवकरच या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेऊन दिला देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, साधारणत: 18800 पासून 23600 पर्यंतचा रस्ता पूर्णत: धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी याबाबत शासनाकडे निर्णयाधीन असल्याचे सांगून असमर्थता व्यक्त केली. तूर्तास, पोलादपूरकरांना महाबळेश्वरपर्यंतचा हा रस्ता किमान खड्डेमुक्त होण्याची अपेक्षा असून डेप्युटी इंजिनीअर देवकाते यांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत या रस्त्यावरील खड्डे भरण्याचा कार्यक्रम जरी सुरू झाला, तरी देवीभक्तांचा प्रवास काहीसा सुखाचा होऊ शकणार आहे.