जळगाव। पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा रविवार 2 एप्रिल रोजी राबविला जाणार आहे. यावेळच्या मोहिमेचे वैशिष्ट्य असे की, पोलिओ डोस पाजण्यासोबतच बालकाची आधार नोंदणीही केली जाणार आहे. त्यासाठी पालकांनी आपला स्वतःचे (आई- वडील पैकी एकाचाच) आधारकार्ड व बालकाच्या जन्माचा दाखलाही सोबत आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आरोग्यसंस्थांमध्ये 170 आधार नोंदणी केंद्र स्थापण्यात आली आहेत.
पोलिओ लसीकरणासाठी केले आवाहन
बालकांना पोलीओचा डोस पाजण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वत्र सज्जता करण्यात आली असून आरोग्य संस्थांमधील पोलिओ बुथवर बालकांचे आधार नोंदणीसाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2 हजार 43 बुथवर 3 लाख 5 हजार 666 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी 5 हजार 561 मनुष्य बळ लागणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हास्तरावरील नियोजन पूर्ण झाले असून त्यासाठी प्रत्येक एस.टी.स्टॅन्ड, रेल्वे स्थानकावर बुथ, खाजगी वाहतुक केंद्र, बाजाराचे ठिकाणी, फिरते पथक, नर्सींग होममध्ये, फिरत्या पथकाद्वारे टिमद्वारे लसीकरण, आवश्यक त्या ठिकाणी रात्रीच्या वेळीही लसीकरणाची सोय अति जोखमीच्या भागात आयपीपीआयमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पालकांनी बाळाच्या आई किंवा वडीलांचे आधार कार्ड आणि बाळाच्या जन्माचा दाखला सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.