पोलिसांची मुजोरी

0

अनेक पोलिसांना त्यांच्या खाकी वर्दीची म्हणजेच अधिकाराची किती गुर्मी असते, हे सर्वश्रुत आहे. ‘मला कोण विचारणार?’, या मगरुरीतून मग ते कायद्याला वाकुल्या दाखवू लागतात. त्यातूनच गुन्हेगारी वृत्ती निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेवर त्याचे प्रयोग केले जातात आणि अशा गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी पुन्हा त्याच अधिकाराचा आधार घेतात! अशा या दुष्टचक्रात सर्वसामान्य जनता मात्र चांगलीच होरपळून निघते. पोलिसांच्या या मनोवृत्तीचे उदाहरण नुकतेच महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांत पाहायला मिळाले. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात घडलेली घटना तर थरकाप उडवणारी आहे. चोर एक गुन्हा लपवतांना दुसरा गुन्हा करत असतो, असे म्हणतात. दुसरा गुन्हा लपवण्यासाठी मग तिसरा, चौथा अशी गुन्ह्यांची मालिकाच तयार होते. ‘हे केवळ चोरांनाच नव्हे, तर पोलिसांनाही लागू आहे’, हे सांगली पोलिसांनी स्वत:च त्यांच्या वर्तनातून सिद्ध केले आहे.

सांगली येथील अनिकेत कोथळे आणि त्याच्या एका मित्रास पोलिसांनी कुठल्यातरी गुन्ह्यात अटक केली. पोलीस कोठडीत असताना ‘थर्ड डिग्री’चा वापर करत पोलिसांनी अनिकेतला अमानुष मारहाण केली. त्यात त्याचा अंत झाला. त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांनी केलेली कृत्ये एखाद्या भयपटातील कथानकाप्रमाणे भयानक होती. अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी पहाटे 4 वाजेपर्यंत सांगली शहरात भटकंती केली. काही जणांच्या साहाय्याने अनिकेतचा मृतदेह पोलिसांच्या वाहनातून कृष्णाकाठी नेण्यात आला. एरव्ही रस्त्यावर उभे राहून वाहनांची पडताळणी करणारे कुणी पोलीस तेव्हा नव्हते का? किंवा त्यांना बेवारसपणे फिरणार्‍या या वाहनाविषयी संशय कसा आला नाही?, हाही एक अनुत्तरित प्रश्‍न आहे. आज संपूर्ण राष्ट्रच आतंकवादाच्या सावटाखाली असताना चोर, दरोडेखोर, आतंकवादी आदी पोलिसांच्या वाहनाचाही वापर करू शकतात, असाही संशय पोलिसांना का आला नाही?, हेही जनतेला कळले पाहिजे. यावरून पोलिसांची गस्त किती सुस्त असते, ते स्पष्ट झाले. येथपर्यंत या खर्‍याखुर्‍या भयपटाचा मध्य होता. त्यानंतर अनिकेतच्या मारेकर्‍यांना कृष्णाकाठी योग्य जागा न मिळाल्याने आणि त्यातच दिवस उजाडण्यास चालू झाल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. तेथून तो मृतदेह सांगलीपासून 150 कि.मी. लांब असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेण्यात आला अन् तेथे तो जाळण्यात आला! यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांनी तिसरा गुन्हा केला, पोलिसांनी अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर अनिकेत आणि त्याच्या मित्राने पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला. यावरून पोलीस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, हे स्पष्ट व्हावे. याशिवाय यापुढे कुणी पोलिसांच्या ताब्यातून खरोखर जरी पळून गेला, तरी त्यावर कुणी विश्‍वास तर ठेवणार नाहीच, पण पोलिसांनीच त्याची हत्या केल्याचा संशय समाजात बळावेल आणि त्यास पोलीस दलातील युवराज कामटेसारख्या प्रवृत्तीच सर्वस्वी जबाबदार असतील. शेवटी सत्य फार काळ लपून राहत नाही, या न्यायाप्रमाणे पोलिसांचे हे अमानुष गुन्हे तत्काळ उघडकीस आले अन् कामटेसह एकूण 12 पोलिसांना अटक करून निलंबित करण्यात आले. आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (‘सीआयडी’मार्फत) या घटनेचे अन्वेषण केले जात आहे. येथेही पोलीस निष्पक्षपणे तपास करतील, यावर स्वत: सरकारचाच विश्‍वास नाही, हे ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याच्या निर्णयावरून स्पष्ट होते.

सध्या राजधानी दिल्ली येथे गाजत असलेल्या प्रद्युम्न हत्याकांडातही पोलिसांनी भलत्याच व्यक्तीला अटक केली. या घटनेचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे गेल्यावर मग या प्रकरणातील खरा मारेकरी सापडला. मग पोलिसांनी खोट्या आरोपीला खरा आरोपी करून अटक कशी केली ? असा प्रश्‍न कुणी विचारत नाही किंवा सरकारही त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. हीच प्रवृत्ती पोलिसांच्या बेबंदशाहीला खतपाणी घालणारी आहे. दिल्ली पोलिसांच्या कृत्यावरून, पोलीस ज्यांना अटक करतात, ते खरे आरोपी असतीलच याची शाश्‍वती यापुढे कुणी देणार नाही. या सर्व गोष्टींमध्ये सामान्य जनता मात्र निष्कारण होरपळत राहील. पोलीस दलात केवळ चोर, दरोडेखोरच नव्हे, तर बलात्कारी, खंडणीखोर आदी गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस आढळून येतात. त्यामुळे सरकारने प्रथम पोलीस दलाचे शुद्धीकरण केले पाहिजे. तेच खर्‍या अर्थाने त्यांचे सशक्तीकरण ठरेल. त्यासाठी सरकारला पोलीस दलातील युवराज कामटेसारख्या प्रवृत्ती प्रथम शोधून काढव्या लागून त्यांना कठोरातील कठोर शासन करावे लागेल. सरकारला पोलिसांच्या बेबंदशाहीला आळा घालावाच लागेल. दुर्दैवाने आजपर्यंत गुन्हेगार पोलिसांना अशी शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही आणि हेच अनिकेत कोथळेसारख्या घटना घडण्यामागचे मूळ कारण आहे. पोलीस दलातील वाढत्या गुन्हेगारीकडे कानाडोळा करणे समाजाच्या हिताचे नाही. पोलिसांकडून जनतेवर जर अशाच प्रकारे अन्याय होत राहिला, तर एक दिवस जनतेचा संयम सुटू शकतो, हे सरकारच्या लक्षात का येत नाही? एकूणच अनिकेत कोथळे प्रकरणावरून ‘समाजाला चोर किंवा दरोडेखोर यांच्यापासून नव्हे, तर पोलिसांपासूनच खरा धोका आहे’, असे जनतेच्या मनात आले नाही तरच नवल. ‘पोलीस’ आणि ‘गुन्हे’, हे विरोधाभासी असणारे शब्द जर समीकरण बनून गेले, तर भविष्यात जनता पोलिसांकडेच संशयाने बघू लागेल आणि असे झाले, तर ते अराजकतेला निमंत्रण देणारे ठरेल, हे मात्र निश्‍चित. म्हणून सरकारने वेळीच योग्य पावले उचलावीत. त्यातच जनहित आहे.