थर्टीफ फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वॉश ऑऊट मोहीम
जळगाव :शहरातील विविध भागात शनिपेठ पोलीस ठाणे व रामानंद नगर पोलीस ठाण्यांतर्फे हद्दीतील गावठी दारुच्या अड्डयावर रविवारी छापे टाकण्यात आले. तसेच अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. यात रामानंदनगर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई केली तर शनिपेठ पोलिसांनी वाल्मिकनगरात कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, हरीविठ्ठल नगर व पिंप्राळा परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू बनविणे व व्रिकी होत असल्याची माहिती रामांनद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी पोलीसांनी धाड टाकून धन्नो यशवंत नेतलेकर कडून 500 रूपये किंमतीची 10 लीटर गावठी हात भट्टी दारू, गोपाळ सोनू कोळी याच्याकडून 700 रूपये किंमतीच 13 लिटर दारू, , ममता सोहम बाटुंगे रा. हरी विठ्ठल नगर या महिलेकडून 750 रूपये किंमतीची 15 लीटर दारू आणि पार्वताबाई राजू भदाणे रा. राजीव गांधी नगर या महिलेकडून 650 रूपये किंमतीची 13 लीटर दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली 3 हजार 500 रूपयांची 71 लीटर दारू नष्ट करण्यात आली आहे तर पिंप्राळा पसिसरात राजू गोविंदा पारधे रा. मढी चौक पिंप्राळा याच्याकडून अवैध विक्री करण्यात येत असल्याने देशी दारुच्या 1 हजार रुपये किमतीच्या 19 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहीदास ठोबरे, पीएसआय कांचन काळे, एपीआय मनोज राठोड, विलास पवार, विजय जाधव, संतोष गिते, ज्ञानेश्वर कोळी, दिव्या छाडेकर, महिला होमगार्ड उज्ज्वला पाटील आणि अतुल पवार यांनी कारवाई केली. याप्रकरणी पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वाल्मिकनगरात शनिपेठ पोलिसांची कारवाई
पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉस्टेबल हकीम शेख, सहाय्यक फौजदार किरण पाठक, मनोज येऊलकर, पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील यांच्या पथकाने वाल्मिकनगरात छापा टाकला. याठिकाणी पथकाने 1060 रुपये किमतीची 15 लीटर गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी विक्रेती महिला यमुनाबाई सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक प्रशांत देशमुख करीत आहेत.