पोलिसांचे घरुन चोरलेले दागिणे शहरातील सराफ व्यावसायिकाला विक्री

0

पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या : एका दिवसाची कोठडी

जळगाव- वडोदरा येथे बहिणीकडे खाजगी कामासाठी गेलेल्या पोलीस कर्मचारी धनंजय अशोक सोनवणे वय 29 रा. रुख्मीणी नगर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिणे व मोबाईल असा एकूण 3 हजार 750 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना 3 रोजी घडली होती. घरफोडी करणार्‍या 5 संशयितांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. चोरट्यांनी चोरलेले दागिणे शहरातील सराफ व्यावसायिकाला विकल्याचे समोर आले असून सराफ व्यावसायिकाकडून पोलिसांनी दागिणे हस्तगत केले आहे. दरम्यान यामुळे चोरीचे दागिणे शहरातील सराफा बाजारात विकत घेत असल्याचे सिध्द झाले आहे.

वाघनगर परिसरातील रुख्मीणी नगरात धनंजय अशोक सोनवणे हे आई मिराबाई, पत्नी सुमित्रा, मुलगा नील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. धनंजय सोनवणे हे एरंडोल येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पत्नी सुमित्रा यांना वाघनगर येथे माहेरी सोडून दिले. यानंतर सोनवणे हे आई मिराबाई यांच्यासह बहिणीकडे वडोदरा येथे गेले. 3 रोजी सकाळी शेजारील सचिन परदेशी यांनी सोनवणे यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली होती. सोनवणे यांनी पत्नी सुमित्रा यांना फोनवरुन प्रकार कळविला. त्यानुसार सुमित्रा त्याच्या वडीलांसह घरी आली. घरात प्रवेश केला असता सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. तर चोरट्यांनी कपाटातील सोन्याची दीड ग्रॅमची 1200 रुपयांची नथ, सोन्याचे दीड ग्रॅमचे 650 रुपयांचे मणी, 900 रुपयांचे चार भारचे चांदीचे पायातील व हातातील वाडे व 1 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 3 हजार 750 रुपयांचा ऐवज लांबविला होता.

पाच संशयित मुद्देमालासह ताब्यात

रामानंदनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचा या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. यात स्थानिक गुन्हे शाखेला विशाल मुरलीधर दाभाडे वय 21 रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी हा संशयित गवसला. खाक्या दाखविल्यावर दाभाडेने साथीदार गुरूजीतसिंग सुजानसिंग बावरी वय 21 रा. शिरसोली नाका, तांबापुरा, विशाल संतोष भोई वय 18 रा. रामेश्वर कॉलनी, राहूल नवल काकडे वय 20 रा. समतानगर व गिरीश अशोक जाधव वय 28 रा.खुपचंद साहित्या अपार्टमेंट, मोहाडी रोड यांची नावे सांगितले. तसेच साथीदारांसोबत सोनवणे यांचे घर फोडल्याची कबूली दिली. गुन्ह्यातील दागिणे हे शहरातील वर्षा ज्वेलर्सचे मालक दिलीप सुरेश वर्मा यांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सराफ व्यावसायिकाकडून मुद्देमाल जप्त केला आहे.