धुळे । आझादनगर पोलिसांनी काल रात्री चर्नी रोडवर छापा टाकून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चर्नीरोडवरील बावर्ची बियरबार व एका घरात देशी-विदेशी दारूचा साठा असल्याची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांना मिळाली. त्यांनी याबाबत खात्री करण्याबाबत आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्ता परदेशी यांना सूचित केले. त्यांनी उपनिरिक्षक उगले, पोलीस नाईक मोबीन शेख, सुनिल पाथरवट, विजय शिरसाठ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक आरिफ शेख, श्रीकांत पाटील, वाहनचालक विलास पाटील, पोकॉ.मनोज बागूल, विनोद वाघ यांना सोबत घेवून चर्नी रोडवरील घर तसेच बावर्ची बियरबार येथे छापा टाकला.
दोन ठिकाणी छापा
या कारवाईत 73 हजार 346 रुपयाचा देशी विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. चर्नीरोडवरील घरातून येथे देशी-विदेशी दारूचा सुमारे 38 हजार 857 रुपयांची देशी-विदेशी दारू सापडली. याप्रकरणी पो.कॉ.निलेश महाजन यांची फिर्याद नोंदविली असून घरमालक शरद नारायणदास जयस्वाल या 50 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर महामार्गालगत दारूविक्रीला बंदी असतांना बावर्ची बियरबार येथे सापडलेल्या 34 हजार 489 रुपयांच्या दारूसाठ्याबद्दल चालक अनिल गोपालदास जयस्वाल या 46 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहे.