भामरागड : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेस मोठे यश मिळाले आहे. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी चकमकीत 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. पोलिसांचे हे कोम्बिंग ऑपरेशन उशीरपर्यंत सुरू होते, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली. रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास सी-60 पथकाचे जवान ताडगाव परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना बोरिया जंगलात पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक उडाली. ही चकमक 11 वाजेपर्यंत सुरू होती. चकमकीत 14 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. यात संपूर्ण दलमच ठार झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
गस्त घालणार्या पथकावर गोळीबार
नक्षलवाद्यांसोबत सकाळी 9.30 ला सुरू झालेली ही चकमक दुपारी 2 वाजेपर्यंत सुरूच होती. भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास नक्षल विरोधी अभियानातील जवान गस्त करीत होते. अचानक त्यांच्यावर नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. या भागात नक्षलवादी दडून असल्याची माहिती आधीच मिळाल्यामुळे सुरक्षा दलाचे जवान सज्ज होते. त्यामुळे नक्षल्यांनी गोळीबार करताच जवानांनीही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 14 नक्षलवादी ठार झाल्याने अन्य नक्षल्यांनी बचावाचा पवित्रा घेतला. जखमी तसेच मृत नक्षलवाद्यांना ओढत नेत नक्षलवादी मागे सरत होते. दुसरीकडे पोलिसांनी त्यांचा मुकाबला केल्यानंतर दुपारी 2 नंतर नक्षल्यांनी घनदाट जंगलाकडे पळ काढणे सुरू केले. तशातही त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू ठेवला होता.
सी-60 पथकाचे अभिनंदन
चकमकीनंतर त्या परिसरात शोध घेतला असता 14 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत नक्षल्यांच्या काही बंदुका व इतर साहित्य सापडले आहे. कारवाईची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेलिकॉप्टरने भामरागडकडे रवाना झाले. सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले जाणार आहेत. आतापर्यंतचे नक्षलविरोधी अभियानातील हे पोलिसांचे सर्वात मोठे यश आहे. गेल्यावर्षी वेगवेगळ्या पोलीस-नक्षल चकमकीत 19 जण ठार झाले होते. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार माहिन्यातच 21 जणांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असल्याचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळाल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी सी-60 पथकाचे अभिनंदन केले आहे. नजिकच्या काळातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे, असे माथुर म्हणाले.