पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला सोलापूरात ठोकल्या बेड्या

0

यावल पोलिसांची कामगिरी ; वड्रीच्या तरुणीवर अत्याचार केल्याचा आहे आरोप

यावल- तालुक्यातील वड्री येथील अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याप्रकरणी विलास सपकाळे (22, रा.वड्री) हा आरोपी वैद्यकीय तपासणीदरम्यान जिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता. आरोपीला तब्बल दहा दिवसानंतर सोलापूरात बेड्या ठोकण्यात आल्या. 20 ऑक्टोंबर रोजी पहाटे आरोपी विलासने गावातीलच तरुणीला पळवून नेल्याने त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. 23 रोजी तरुणासह तरुणीला यावल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस 26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, हवालदार नेताजी वंजारी जळगाव शासकीय महाविद्यालयात घेवून गेल्यानंतर आरोपीने पोलिसांना गुंगारा देत सायंकाळी पळ काढला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल होता.

सोलापूरात आरोपीला ठोकल्या बेड्या
पोलिसांच्या तावडीतून आरोपी मुकूंदा सपकाळे पळाल्यानंतर त्याच्याजवळ मोबाईलदेखील नसल्याने त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी उपनिरीक्षक दीपक ढोमणे, हवालदार नेताजी वंजारी, संजीव चौधरी, राजेश वाढे, भुषण चव्हाण, ईस्माईल तडवी यांच्या पथकास नेमलेे. या पथकाने संशयीताचे आई-वडील हे सोलापूर येथे ऊस तोडीसाठी गेल्याचे कळाल्यानंतर सापळा रचून जेहूर, ता.करमाळा, जिल्हा सोलापूर येथून सोलापूर जिल्ह्याचे मुख्यालयातील पोलिस निरीक्षक कैलास काळे यांच्या मदतीने त्यास 1 नोव्हेंबरच्या पहाटे ताब्यात घेत यावलला आणले.