खासगी डॉक्टर पैसे उकळत असल्याचा प्रकार उघड
जळगाव : पोलीस कर्मचार्यांना वर्षाला फिटनेस भत्ता मिळत असतो. या फिटनेस भत्त्यासाठी वैद्यकीय अधिकार्याचे फिटनेस असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. पोलीस कर्मचार्यांचा तपासण्यांचा ठेका खाजगी डॉक्टरांना सोपविण्यात आला असून संबंधित खाजगी डॉक्टरला शासनाकडून रक्कम मिळत असतानाही तो प्रत्येक कर्मचार्यांकडून तपासणीपोटी 200 रुपये वसूल करत असल्याच प्रकार समोर आला आहे. एवढेच नाहीतर सदरचा डॉक्टर जास्तीचे पैसे घेवून अनफिट कर्मचार्यांला फीट दाखवून फिटनेस प्रमाणपत्र देत असल्यामुळे अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या गोरखधंद्याची बोंब फुटली आहे.
फिटनेस तपासणीत पात्र झाल्यावर मिळतो भत्ता
महाराष्ट्र पोलिस दलातर्फे निर्धारीत करण्यात आलेल्या मानका नुसार पोलिस कर्मचार्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी दरवर्षी फिटनेस तपासणी करण्यात येते. त्या अंतर्गत कर्मचार्याची उंची अनुसार असलेले वजन, वयाच्या तुलनेत जडलेल्या विवधी व्याधी आणि शरीर प्रकृती अशी सर्वांगीण आरोग्य तपासणीत पात्र ठरणार्या प्रत्येक कर्मचार्याला वर्षाला 1 हजार 800 रुपये फिटनेस भत्ता दिला जातो. दर वर्षी कर्मचार्यांनी निर्धारीत केलेल्या डॉक्टरांकडून तपासणी करुन फिटनेस प्रमाणपत्र जोडल्यावर भत्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग होते.
अनफिट कर्मचार्यालाही दाखवतात फिट
पोलिस दलातर्फे शासकिय रुग्णालय वगळता शहरात दोन खासगी दवाखान्यांना ही मान्यता दिली असून त्यापैकी आकाशवाणी चौकातील दवाखान्यात तपासणी प्रमाणपत्राचे कर्मचार्यांकडून पैसे आकारले जात नाही, तर शाहु नगरातील खासगी रुग्णालयात मात्र हातात प्रमाणपत्र देण्यापुर्वीच फिट असलेल्या प्रत्येक कर्मचार्याला 200 रुपये आकारण्यात येतात. अनफिट कर्मचार्याला फिट्ट करण्यासाठी हे डॉक्टर साहेब पाचशे ते सातशे रुपये घेत असल्याचे तपासणी करुन आलेल्या कर्मचार्यांतर्फे सांगण्यात आले.
शासनातर्फे प्रत्येक कर्मचारी तपासणीची ठराविक रक्कम या रुग्णालयाला अदा करण्यात येत असतांना कर्मचार्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याचे कारण काय ? तसेच जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येच्या उपचारासाठी सक्षम असतांना शासकिय कर्मचार्यांच्या फिटनेस तपासणी साठी खासगी रुग्णालयांचा हट्ट का? असे प्रश्न उपस्थित होत असून चौकशी मागणी होत आहे.