जळगाव : अक्षयतृतीया, रमजान ईद आणि परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एमआयडीसी पोलिस हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हा न्यायालयाने 15 दिवसांसाठी जिल्हाबंदी करण्याचे आदेश सोमवार, 2 मे रोजी दुपारी काढले आहेत.
उत्सव शांततेत पार पाडण्याचे नियोजन
जिल्ह्यात अक्षय तृतीया, रमजान ईद व परशूराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) आणि मयुर देविदास बागडे (मच्छिबाजार, तांबापुरा, जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली. यातील दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर हाणामारी, घरफोडी, जबरी चोरी असे 15 गुन्हे दाखल आहेत तर मयुर देविदास बागडे याच्यावर मारामारी, चोरी व अवैध दारू सोबत बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हवालदार नितीन पाटील, पोलिस नाईक इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, गोविंदा पाटील, किशोर पाटील, इमरान बेग यांच्या पथकाने केली.