पुणे : पौड हद्दीतील लवळे येथील ऑक्सफोर्ट रिसॉर्ट येथे दि. 29 डिसें. ते 31 डिसें. 2018 रोजी सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. अमली पदार्थांचे मार्केटिंग करणारे, आर्थिक स्वार्थासाठी तरुणपिढीला उध्वस्त करणारा सनबर्न फेस्टिव्हल रद्द करण्याच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये संघटनेचे शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, प्रवक्ते सॅन्ड्रा डिसोझा, संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, जितेंद्र जुनेजा, दिलीप देहाडे, विभागप्रमुख फारुख शेख, दिवेश पिंगळे, सतीश कदम, अब्दुल शेख, आम आदमी पार्टीचे यशवंत कांबळे, देहूरोड कृती समितीचे सोलोमन भंडारे, हमीद शेख, बाळू अडागळे, इरफान सय्यद, संदीप साळवे, मनोज मोरे, विकी जोगदंड, तौफिक शेख, हरेश खरतमल, फेरोज अत्तर, केशव बुडगल, वैभव गजधने यांच्यासहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा
सिद्दीक शेख यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना सांगितले की, या फेस्टिव्हलमध्ये ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम पायदळी तुडवून कायदयाचे उल्लंघन करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून तरुणांना हेरून चरस, गांजा, हेरॉईन यांसारख्या अनेक अमली पदार्थांचे मार्केटिंग होणार आहे. तसेच अनेक बेकायदेशीर कृत्य त्या फेस्टिव्हल मध्ये घडणार आहेत. अशा प्रकरणामुळेच गोव्यातून सनबर्नला हद्दपार केले होते. परंतु, महारष्ट्र सरकार व पुणे जिल्हाधिकार्यांनी सनबर्न सारख्या समाजविघातक उत्सवाला पुण्यामध्ये परवानगी देऊन पुण्यातील शैक्षणिक, सामाजिक, ऐतेहासिक परंपरेचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, पर्यावरण व सांस्कृतिक विभागाच्या मंत्र्यांनी सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी देऊ नये व हा समाजविघातक फेस्टिव्हल रद्द करावा अन्यथा बेंगलोर- मुंबई हायवेवरती रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
यावेळी पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अपना वतनच्या मागण्या संबंधित विभागाकडे तातडीने पोहचवुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन विशेष शाखेचे पोलीस अधिकारी राजू मोरे यांनी दिले. त्यामुळे संघटनेने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळेस ‘पर्यावरणमंत्री हाय हाय’, सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, यांसारख्या घोषणा देण्यात आल्या.