पोलिसांच्या वैयक्तीक सुखाच्या त्यागामुळे समाजस्वास्थ्य टिकून

0

जळगाव । समाजात शांतता आणि सुख नांदावे यासाठी पोलीस आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करतात. त्यांच्या या त्यागामुळेच समाजस्वास्थ्य टिकून आहे. ‘आधी देश आणि मग कुटूंब’ हे तत्त्व अंगिकारुन होत असलेली त्यांची देशसेवा खरोखरीच कौतुकास्पद आहे,अशा शब्दात राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पोलिसांच्या सेवाकार्याचा गौरव केला. येथील पोलीस मुख्यालयातील ‘मंगलम’ या बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण ना खोत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर आदी मान्यवर व पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

माणूस पदव्यांनी नव्हे तर त्याच्या वर्तणुकीतून विद्वान ठरतो
यावेळी बोलतांना ना. खोत यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समाजातील कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अहोरात्र सुरु असलेल्या प्रयत्नांचा आणि त्यासाठी करत असलेल्या त्यागाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पोलिसांच्या कल्याणासाठी उभारण्यात आलेल्या या सभागृहातील विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतूक केले. येथे उपलब्ध असलेल्या वाचनालयाच्या सुविधेबद्दल ते म्हणाले की, वाचनाने माणूस समृद्ध होतो. माणूस पदव्यांनी नव्हे तर त्याच्या वर्तणूकीतून विद्वान असल्याचे दिसून येते आणि हे वाचनामुळे शक्य होते असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपधिक्षक गृह एम.बी.पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले.