गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील 10 रोजीचा प्रकार
भुसावळ, जळगाव लोहमार्ग पोलिसांसह नशिराबाद पोलिसांची कामगिरी
कडगाव रेल्वेपूलाजवळील रुळावर मृतदेह सापडला
जळगाव : गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवासादरम्यान तरुण बेपत्ता झाल्याबाबत भुसावळ रेल्वे पोलिसाकडून तक्रार आली. पोलिसांनी जळगाव लोहमार्ग व त्यानंतर नशिराबाद पोलीस अशी सूत्रे हालवली अन् अवघ्या तीन तासातच बेपत्ता तरुणाचा छडा लागला. 10 रोजी कडगाव रेल्वे पूलावजळ आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविल्यावर तो एक्स्प्रसेमधील बेपत्ता तरुणच असल्याचे निष्पन्न झाले. अमितकुमार रामपारस पंडीत (22) रा. चांदीबारी जि. राणी फुतर पूर्णिया (बिहार) असे त्याचे नाव आहे. दरम्यान सामान्य व्यक्तीच्या शोधासाठी लोहमार्ग व नशिराबाद पोलिसांच्या दिवसभरातील तपासचक्राने, धावपळीने, कसरतीने पोलिस दलाच्या ‘सद्क्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याचा सर्वांनाच प्रत्यय आला. जळगाव, भुसावळ व नशिराबाद पोलीस कर्मचार्याच्या सजग पोलिसिंगमुळे दुःखातील बिहारवासिय अवाक् झाले होते.
अमितकुमार पंडीत हा गोव्यातील एका कंपनीत कामगार आहे. खाजगी कामासाठी तो त्याचा मित्र अशोककुमारसिंह याच्यासह गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधुन पटना येथे जात होता. भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यावर अशोककुमार याला अमितकुमार गाडीत दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतल्यावर तो त्याची बेपत्ता झाल्याची खात्री झाली. यानंतर अशोक भुसावळ स्थानकावर उतरला व त्याने याप्रकाराबाबत तेथील रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
अन् काही तासातच हलली सूत्रे
भुसावळ रेल्वे पोलिसांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांना तरूणाचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. यानंतर जळगाव लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या हद्दीतील संपूर्ण रेल्वे रुळ तसेच परिसर पिंजून काढला मात्र शोध लागला नाही. यानंतर भुसावळ रेल्वे पोलिसांनी नशिराबाद पोलिसांची मदत घेतली. व त्यांना सुचना केल्या. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह हेड कॉन्सटेबल राजेंद्र साळुंखे, पोलीस नाईक गुलाब माळी यांनी तपासचक्रे फिरविली व हद्दीतील रेल्वे रुळावर शोध घेतला असता कडगाव रेल्वे पूलाजवळील रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह मिळून आला.
शोध लागला मात्र मिळाला तरुणाचा मृतेदह
नशिराबाद पोलिसांना मृतदेहाच्या खिशातील आधारकार्डची तपासणी केली असता तो अमित कुमारच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी याबाबत तत्काळ भुसावळ रेल्वे पोलीसांना माहिती दिली. माहितीनुसार अशोककुमार नशिराबादला आला. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी अमितच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावरुन शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अमितकुमारचे मामा कन्हैया पंडीत नातेवाईंकासह जळगावला आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेवून नेरी नाका येथील स्मशानभूमित त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.