जळगाव– रामानंदनगर पोलिसांना गस्त घालत असतांना एका रिक्षावर संशय आला. चालकासह मागील सीटावर दोन जण बसले होते. कर्मचारी तपासणीसाठी रिक्षा थांबविणार तोच…चालकाने पोलिसांना पाहताच भरधाव वेगाने वेगवेगळ्या गल्लीमधून रिक्षा पळविली. पोलिसांनी पाठलाग करुन एका ठिकाणी रिक्षा पकडली. रिक्षात तपासणी केली असता, रिक्षात इम्पिरिअल ब्लु या ब्रॅन्डच्या लहान मोठ्या अशा विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. सागरपार्क परिसरात पोलिसांनी शनिवारी दुपारी 12.30 वाजता ही कारवाई केली. रिक्षाचालकाकडे मद्य वाहतुकीसह मद्य पिण्याचा असा कुठलाही परवाना नसल्याने कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी 31 हजार 320 रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या असून रिक्षाचालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
या पथकाने केली कारवाई
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुहास राऊत, सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, विलास पवार, जयंत कुमावत, नितीन अत्तरदे, निलेश गंडगव्हाळ हे रामानंदनगर रोडवर असलेल्या चर्च परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान याठिकाणाहून जात असलेल्या एम.एच.19 व्ही.3476 या क्रमाकांच्या रिक्षावर
संशय आला. कर्मचार्यांनी तपासणीसाठी रिक्षाचालकाला थांबण्याचा इशारा गेेला. मात्र पोलिसांना पाहताच रिक्षाचालकाने चर्च परिसरात गल्ल्यांमधून रिक्षा पळविली. सागरपार्क परिसरात पाळलाग करुन पथकाने रिक्षा पकडली. तपासणी केली असता रिक्षात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.
रिक्षाचालकासह तिघांना घेतले ताब्यात
पोलिसांनी चौकशी केली असता, शेख निजामुद्दीन शेख खुशूबुद्दीन वय 33 रा. तांबापुरा असे रिक्षाचालकाचे नाव समोर आले. त्याच्याकडे मद्यवाहतुकीसह मद्य पिण्याबाबतचा कुठलाही परवाना नव्हता. यानंतर पोलिसांनी रिक्षा जप्त करत रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणली. रिक्षासह 31 हजार 320 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच रिक्षाचालकासह रिक्षातील राकेश धनराज हटकर वय 21 व रविंद्र राजू हटकर रा. 30 दोघे रा. तांबापुरा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी विलास पवार यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु होती.