पोलिसांनी तपासले मोबाईल रेकॉर्ड

0

जळगाव । भादली गावातील हत्याकांडाला नऊ दिवस उलटले असून तरीही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी संशयीतांचे मोबाइल रेकॉर्ड तपासले. त्यात काही संशयास्पद आढळते का यासाठी त्यांनी मोबाइलचे रेकॉर्ड तपासले. तसेच गावातील दोन ठिकाणी गुप्त माहिती देण्यासाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत.

भादली येथील प्रदीप सुरेश भोळे, पत्नी संगीता सुरेश भोळे , मुलगी दिव्या प्रदीप भोळे, तर मुलगा चेतन प्रदीप भोळे यांचा खून झाल्याची घटना 20 मार्च रोजी समोर आली होती. तेव्हापासून पोलिस वेगवेगळ्या पातळ्यांवर या घटनेचा तपास करीत आहेत. मात्र पोलिसांच्या हाती अजूनही काहीच लागलेले नाही. मृतांचे व्हीसेरा, घटनास्थळावरील काही नमूने मुंबई येथील कलीना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे त्या अहवाल आल्यानंतर तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. तसेच भादली येथील भोळे कुटुंबियांच्या हत्याकांडाला मंगळवारी 9 दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही गावात सर्व स्मशान शांतता होती. गावातील प्रमुख चौकांमध्ये ग्रामस्थ घटने विषयीची दबक्या आवाजात चर्चा करीत होती.