पोलिसांनी पकडलेल्या अवैध वाळूच्या ट्रकवर ’महसूल’कारवाई करेना?

0

ताडपत्री झाकून वाळूची तस्करी करणार पकडला होता ट्रक ; तहसीलदारांकडे ट्रक व वाळूचा पाठविला आहे अहवाल

जळगाव : पोलिसांनी पकडलेले वाहने महसूल विभागाने परस्पर सोडून देणे, थेट जिल्हाधिकारी कार्यालयातूनही वाहने पळविण्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. नेमका असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी अवैध वाळूचा ट्रक पकडून दंडात्मक कारवाईसाठी त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे. मात्र यावर आठवडा उलटूनही कुठलीही कारवाई झाली नसल्याने नेमके पाणी कुठे मुरतयं असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित वाळू माफिया व महसूल विभागाच्या मिलिभगत मधून तर ही कारवाई दडपली जात नाहीये ना ? असाही संशय निर्माण झाला आहे.

दंडात्मक कारवाई मोठी असल्याने पाठविला अहवाल
कारवाई टाळण्यासाठी वाळू माफियांनी आता ताडपत्री झाकलेल्या ट्रकमधून वाळूची तस्करी करायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी अयोध्या नगरात ताडपत्री झाकलेला असाच अवैध वाळूचा ट्रक (क्र.एम.एच.19 जे. 905) पकडला होता. एका ठिकाणी या ट्रकमधून वाळू उपसली जात असतानाच हा ट्रक जप्त करुन पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे, गुन्हा दाखलपेक्षा दंडात्मक कारवाई मोठी असल्याने पोलिसांनी तहसीलदारांकडे ट्रक व वाळूचा अहवाल पाठविला, मात्र त्यावर आठवडा उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही.

वाळू व्यावसायिकांची यंत्रणांमधील अधिकार्‍यांशी मिलीभगत
शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध वाळूची तस्करी सुरु आहे. आव्हाणे, धानोरा, वडनगरी, निमखेडी, फुपनगरी, खेडी या भागातून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरु असून ट्रॅक्टर व डंपरद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. दुसरीकडे गस्तीवर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीचे वाहने पकडली तरी त्यावर महसूल विभागाकडून कारवाई होत नाही. वाळू माफियांची महसूल, पोलीस व आरटीओ या तिन्ही विभागातील काही मोजक्या अधिकार्‍यांशी मिलिभगत असल्याचा संशय असून काहींची तर थेट भागीदारीच आहे. वाळूत भागीदारी असलेल्या पोलिसांवर याआधी कारवाया झाल्या आहेत तर अजूनही काही पोलीस सक्रीय असल्याची विश्‍वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

3 महिन्यांपासून ट्रॅक्टरवर कारवाईचा अहवाल पडून
कोंम्बीग ऑपरेशन दरम्यान मेहरुण भागात 30 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले होते. या ट्रॅक्टर चालकाकडे वाहन परवाना, गौण खनिज परवाना व इतर कोणतेच कागदपत्रे नव्हते. सुधाकर विनोद सपकाळे (36, रा.खेडी कढोली, ता.एरंडोल) असे चालकाचे नाव समोर आल्यावर फौजदार पाटील यांनी तलाठ्याच्या ताब्यात ट्रॅक्टर दिले व यानंतर तहसीलदारांना लेखी अहवाल सादर केला. या ट्रॅक्टरचे पुढे काय झाले त्याची काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.