भुसावळातील पोलिसांच्या कार्याचे शहरवासीयांनी केले कौतुक
भुसावळ- पोलिसांमधील माणुसकी लोप पावत असल्याच्या वल्गना होत असल्यातरी भुसावळातील पोलीस बांधव मात्र त्यासाठी अपवाद ठरले आहेत. रस्त्यावर बेवारसपणे पडलेली पर्स पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलेला पर्स परत करून समाजात आजही पोलिसांमधील माणुसकी धर्म शिल्लक असल्याचा प्रयत्न दिला. पोलिसांनी दाखवलेल्या या प्रामाणिपणाचे शहरवासीयांमधून कौतुक होत आहे.
सापडलेली पर्स केली प्रामाणिकपणे परत
जळगाव जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष शैलेश राणे यांच्या सौभाग्यवती कांचन शैलेश राणे या रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने दवाखान्यात जात असताना भुसावळ शहर पोलीस ठाण्याजवळ त्यांची पर्स पडली. यावेळी रस्त्यावरून जाणार्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी लतीफ पठाण यांना ती आढळल्यानंतर त्यांनी ती पर्स शहर पोलीस ठाण्यात आणली. पर्समध्ये 12 हजारांचा मोबाईल, सहा हजार 800 रुपयांची रोकड तसेच लायसन्स व अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती. पठाण यांनी पर्समधील मोबाईलद्वारे संंबंधिताचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असतानाच कांचन राणे यांना घरी गेल्यानंतर पर्स गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी पर्समधील मोबाईलवर संपर्क साधला. पठाण यांनी प्रतिसाद देत पर्स सापडल्याचे सांगितले. उभय दाम्पत्याने शहर पोलीस ठाणे गाठून पर्सची ओळख पटली. पोलीस कर्मचार्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणासाठी बक्षीसही देऊ करण्यात आले मात्र भावनेपेक्षा कर्तव्य मोठे माणुन पोलीस कर्मचार्याने रक्कम घेण्यास नम्रपणे नकार दिला. याप्रसंगी दाम्पत्यास पठाण यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हवालदार संजय पाटील, पोलीस नाईक विनोद तडवी यांच्या उपस्थितीत पर्स देण्यात आली. पोलीस कर्मचार्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी कौतुक केले.