सोनगीर। तालुक्यातील देवभाने शिवारात बंदुकीचा धाक दाखवत तीन दरोडेखोरांनी इंदूर येथील व्यापार्यांची 10 लाखांची रोकड लुटून नेली. हे दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून 10 लाखांच्या रोकडसह 25 लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा आम्हीच उघडकीस आणला असल्याचा दावा नाशिक आणि सोनगीर पोलिसांनी स्वतंत्रपणे केल्याने दोन्ही जिल्ह्याच्या पोलिसांमध्ये श्रेयवाद रंगला आहे.
सोनगीर पोलिसांची कारवाई
सोनगीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आर्वी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन तवेरा गाडीचा क्रमांक मिळविला. या क्रमांकाची धुळे आरटीओ कार्यालयातून माहिती मिळवून हि गाडी नाशिकमधील सिडको भागातील अशोक रेवाजी याची असल्याचे निष्पन्न केले. यानंतर हि सर्व सविस्तर माहिती नाशिकमधील अंबड पोलिसांना दिली होती. तसेच येथून सोनगीर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत चातूरे,हवालदार अविनाश पाटील, राजेंद्र पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सचिन गोमसाळे, मदने यांना नाशिकला पाठविले.
नाशिक पोलिसांनी केली घोषणा
अंबड पोलिसांनी धुळे पोलिसांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवत मिळालेल्या माहितीच्या आधारे तवेरा गाडी, गणेश नानाजी भामरे, नाझीम सत्तार शेख, शुभम सुरेश बागुल यांना त्यांच्या पोलीस ठाण्यात अटक दाखविले. न्यायालयाच्या आदेशाने संशयित ताब्यात मिळाले असले तरी रोकड व ऐवज सोनगीर पोलिसांना देण्यात आले नाही. तात्काळ नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन सोनगीरचा दरोडा उघडकीस आणून आरोपनी व रोकड जप्त करण्यात आल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. यावेळी नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल व अंबड पोलीस उपस्थित होते. दरोड्यातील आरोपी सोनगीर येथे आणण्यात आले आहेत. सोनगीर पोलिसांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारेच आरोपी जेरबंद झाले आहेत. यामुळे हा दरोडा आपण उघडकीस आणल्याचा येथील पोलिसांनीही दावा केला आहे. आरोपींची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता नाशिक आणि सोनगीर पोलिसांनी स्वतंत्रपणे गुन्हा उघकीस आणल्याचा दावा केल्याने दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांमध्ये श्रेयवादाला सुरवात झाली आहे. दरोडा कुणीही उघडकीस आणला असला तरी महाराष्ट्र पोलिसांची ही कामगिरी आहे, अशी चर्चा आहे.
तीन व्यापार्यांना लुटले
मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील सराफ राजेश निमा यांचेकडून अरुण सत्यनारायण राठोड, पुतीन गुप्ता व लोकेश नहार या तिघा व्यापार्यांनी दि. 15 रोजी रात्री सुमारे दोन किलो सोने घेतले. तिघे व्यापारी खाजगी लक्झरी बसने नाशिकला आले. अशोक स्तंभाजवळील अशोक भाई यांना तिघांनी त्यांच्या जवळचे दोन किलो सोने विक्री करुन त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन ते घराकडे निघाले. ते तिघे द्वारका सर्कलला उभे असतांनाच तवेरा गाडीमधील (एमएच 46, डब्ल्यू 5876) तिघांनी येऊन देवभाने गावाजवळ राठोड, गुप्ता व नहार यांना मारहाण करुन 10 लाख 51 हजार 900 रुपये लुटले होते. याप्रकरणी अरुण राठोड यांनी सोनगीर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.